छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या शिवचरित्राचे अभ्यासक असणाऱ्या उपराष्ट्रपतींनी आपले दायित्व संयत पद्धतीने बजावले मात्र विपर्यस्त अर्थ लावून आक्रस्ताळेपणा करणे हा शिवसेनेचा स्थायीभाव – अॅड.दीपक पटवर्धन.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र भारतीय अस्मितेचा मानबिंदू आहे. उपराष्ट्रपती यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला असा अर्थ काढणे म्हणजे विपर्यस्तपणाचा कहर आहे, अशी प्रतिक्रिया अॅड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे अभ्यासक, आई भगवतीचे पुजक असलेले सदाचरणी व्यक्तिमत्व म्हणजे व्यंकय्याजी नायडू. त्यांनी आपले घटनात्मक दायित्व निभावत अत्यंत संयत पद्धतीने परिस्थिती हाताळली. काँग्रेस सदस्यांनी घेतलेल्या आक्षेपाला बगल देत शपथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शपथ ग्रहण करताना कोणत्याही घोषणा नको, भविष्यासाठी माहिती म्हणून हे ध्यानात घ्या असे सूचित केले. यामध्ये महाराजांचा, आई भवानी मातेचा अवमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याबाबत ट्विटरच्या माध्यमातून मा. उपराष्ट्रपतींनी आपली बाजूही मांडली आहे. इतके संवेदनशील असलेल्या, घटनात्मक पद आणि घटनात्मक दायित्व निभावणाऱ्या उपराष्ट्रपतींच्या बोलण्याचा विपर्यस्त अर्थ आपल्या बुद्धीनुसार काढून उपराष्ट्रपतींचा पुतळा जाळणे, उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीला चोर संबोधणे, असले प्रकार जाहीरपणे करणे हे निंदनीय आहे असे पटवर्धन म्हणाले. उपराष्ट्रपती हा कोणत्याही पक्षाचा नसतो. भाजपा खासदारांनी शिवरायांचे नाव घेतले असताना कॉंग्रेस सदस्यांनी आक्षेप घेवूनही भाजपाचे नावाने खडे फोडणे हे राजकीय कावीळ झाल्याचे लक्षण आहे असे पटवर्धन म्हणाले. उपराष्ट्रपतींचा पुतळा जाळून त्यांना अवमानीत करणे, घोषणा देणे हे गुन्ह्याचे कृत्य आहे आणि याची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली.
www.konkantoday.com