
खेड क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृह बंद
खेड शहरातील महाडनाका येथील तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृह १ जानेवारीपासून खेळाडूंसाठी बंदच करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार, तालुका क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सातत्याने कल्पना देवूनही अद्याप बॅडमिंटन सभागृह खेळाडूंसाठी खुले झालेले नाही. या पार्श्वभूमीवर बॅडमिंटन खेळणार्या तरूणांनी २६ जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकार्यांना दिले.
श्रीकांत कदम, अमित लाड, कपिल कोळेकर, सौरभ नागणे, विपीन पाणापल्ली, जयेश शिर्के, परिमल पाटणे, आदी खेळाडू गेल्या पाच वर्षापासून क्रीडा संकुलात नियमितपणे बॅडमिंटन खेळत आहेत. क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापानाने निश्चित केलेली फी दरवर्षी पूर्णपणे भरून खेळाचा आनंद घेत होते. मात्र काही जणांनी फी न भरल्यामुळे तसेच व्यवस्थापनाने फी वसूल केली नसल्याची सबब पुढे करत बॅडमिंटन सभागृह बंद करण्यात आले आहे.
कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून होतकरू खेळाडूंसाठी ९ वर्षापूर्वी क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. क्रीडा संकुलात शासनाकडून सुविधा देण्यात आल्या असल्या तरी क्रीडा संकुलाच्या देखभालीकडे तालुकास्तरीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
www.konkantoday.com