
आरवली ते वाकेड या पन्नास किमी टप्प्यातील सुमारे १८ किमीचा रस्ता काँक्रिटचा नव्हे तर डांबरी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये आरवली ते वाकेड या पन्नास किमी टप्प्यातील सुमारे १८ किमीचा रस्ता काँक्रिटीकरण नव्हे तर डांबरी करण्यात आला आहे. या टप्प्यातील ४५ टक्के रस्ता पूर्ण झाला असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.मंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २०६ किमी लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर कणकवली, कुडाळ अशा एकूण सहा टप्प्यांचा समावेश आहे. चौपदरीकरणाचे काम २०१६ ला सुरू करण्यात आले होते. ते २०१९ ला पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु विविध अडचणींमुळे कामाला विलंब झाला. आतापर्यंत १७७ किमीचा रस्ता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा रस्ता पूर्णतः काँक्रिटचा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या टप्प्यातील काही भागात सध्या डांबरी रस्ता तयार केला जात आहे. जुन्या ठेकेदाराने या टप्प्यातील काम सोडल्यानंतर नव्याने आलेल्या ठेकेदाराने काम वेगाने सुरू केले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५० किमीच्या या टप्प्यातील १८ किमीचा रस्ता डांबरी होणार आहे. www.konkantoday.com