
दस्तऐवजाची नोंदणी करताना साक्षीदाराची गरज राहणार नाही
रत्नागिरी ः मालमत्तेचा खरेदी-विक्री दस्तऐवज करताना आता यापुढे साक्षीदाराची गरज राहणार नाही. खरेदी आणि विक्री करणार्याकडे आधारकार्ड असेल तर दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. हा नवा निर्णय सरकारने घेतला असून यासाठी मात्र आधारकार्ड जरूरीचे राहणार आहे. आधारकार्डच्या क्रमांकावरून ओळख पटविण्यासाठी इंटरनेटऐवजी नोंदणी विभागाच्या स्वतंत्र प्रणालीला ही सेवा देण्याचा प्रस्ताव नोंदणी विभागाने युआयडीएआयकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे दस्तऐवज नोंदणी करताना साक्षीदारांची गरज राहणार नाही. आधारकार्डची सत्यता पडताळण्यासाठी बायोमेट्रीक मशिनद्वारे अंगठ्याचे ठसे घेतले जातील व त्याची पडताळणी करण्यात येईल. नोंदणी महानिरीक्षकांनी हा निर्णय घेतला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात अद्यापही त्याबाबत माहिती आली नसल्याने पूर्वीप्रमाणेच साक्षीदारांमार्फत दस्तऐवज करण्याचे काम सुरू आहे.
www.konkantoday.com