केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; एसआयआरचा दुसरा टप्पा जाहीर, १२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचा समावेश!

बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीमुळे (एसआयआर) मोठ्या प्रमाणात वाद उद्भवल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या या एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेत जोरदार टीका केली होती. यावरून चांगलंच राजकारणही तापल्याचं पाहायला मिळालं. मात्र, असं असतानाही आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. देशातील १२ राज्यांसह काही केंद्रशासित प्रदेशांत एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.

ज्ञानेश कुमार यांनी काय म्हटलं?

“बिहारमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा यशस्वी पार पाडल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राज्यातील निवडणूक आयोगाच्या आयुक्तांबरोबर एक महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीत एसआयआरबाबत सविस्तर चर्चा झाली. एसआयआरचा पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर आता काही राज्यात यशस्वी एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. एसआयआरचा मुख्य उद्देश हाच आहे की प्रत्येक योग्य मतदाराचा मतदार यादीत समावेश करणं आणि अयोग्य मतदाराचं नाव मतदार यादीतून कमी करणं”, असं निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे.

“बिहारमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता देशातील १२ राज्य आणि काही केंद्र शासित प्रदेशात एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. आता या १२ राज्यात आणि काही केंद्र शासित प्रदेशात एसआयआर करण्यात येणार असल्यामुळे आज रात्री १२ नंतर येथील मतदार याद्या गोठवण्यात येतील”, निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं आहे.

कोणत्या राज्यात एसआयआर होणार?

छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुडूचेरी, राज्यस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार या ठिकाणी एसआयआरचा दुसरा टप्पा पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button