
रत्नागिरीच्या जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या खुर्चीला लागले ग्रहण, मुदत संपण्याआधीच अधिकार्यांच्या होवू लागल्या बदल्या
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या पदाच्या खुर्चीला सध्या ग्रहण लागल्याचे दिसत आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी व शासनाचे प्रतिनिधी असलेले मुख्याधिकारी यांच्यात मतभेद होत असल्याने रत्नागिरी जि.प.च्या काही वर्षाचा आढावा घेतला व येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती आधीच बदल्या होत असल्याचे दिसत आहे. रत्नागिरीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची काल तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी श्रीमती इंदुराणी जाखड यांची नेमणूक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास पाहता गेल्या काही वर्षापासून अधिकारी विरूद्ध पदाधिकारी असा वाद रंगत आहे. २०१५ साली प्रेरणा देशभ्रतार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात येणार होता परंतु त्याआधीच त्यांची बदली झाली होती. त्यानंतर आलेले सध्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची कारकिर्द दीड वर्ष योग्य पद्धतीने चालली परंतु त्यांची २०१८ मध्ये बदली झाली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नेमणूक झाली परंतु त्यानंतरही पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात खटके उडाले. त्यामुळे त्यांच्यावरही अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. परंतु त्याआधीच त्यांचीही बदली झाल्याने हा अविश्वास ठराव बारगळला होता. त्यांच्याजागी डिसेंबर १९ मध्ये कान्हुराज बगाटे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी घेतलेल्या निर्णयावर पदाधिकारी व सदस्यांच्यात त्यांच्याविरोधात कुरबूर निर्माण झाली होती. काही सदस्यांनी तर त्यांच्या बदलीचीही मागणी अंतर्गत बैठकीत केली होती. बगाटे हे वैद्यकीय रजेवर होते. काल अचानक शासनाने ६ आयएसआय अधिकार्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये गडचिरोली येेथे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली. बगाटे यांना मात्र अद्यापही कोणताही पदभार देण्यात आलेला नाही. यामुळे सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकार्यांची खुर्चीला ग्रहण लागल्याचे दिसत आहे.
www.konkantoday.com