सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांविरोधात जाऊन शासन कोणताही निर्णय घेणार नाही -ना.उदय सामंत
शांतता समितीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवासाठी सात दिवसांच्या क्वारंटाईनची मागणी केली होती. ही मागणी केली म्हणजे ती मान्य झाली, असे नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांविरोधात जाऊन शासन कोणताही निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना आधी क्वारंटाईन करावे, त्याचा कालावधी याबाबत सिंधुदुर्ग सरपंच संघटनेने भूमिका घेतली आहे. त्याचा संदर्भ देवून श्री. सामंत म्हणाले, “जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीत सात दिवसांच्या क्वारंटाईनची मागणी करण्यात आली होती.बैठकीत करण्यात आलेल्या मागण्यांचे एकत्रीकरण करून शासनाला पाठविल्या आहेत. त्यात माझ्याही सूचना मी मांडल्या आहेत. यात ई-पास परवानगी अधिकार आयुक्त यांच्याकडे न देता पोलिस निरीक्षक यांना द्यावेत. त्यात सुलभता आणावी. मागेल त्याला पास मिळावा. खासगी वाहनातून येणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करावा. चाकरमान्यांना येण्या जाण्यासाठी एसटीची सुविधा करावी. त्यासाठी त्यांच्याकडून वाढीव तिकीट न घेता नियमित दर घ्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.”
www.konkantoday.com