
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात धक्कादायक घटना, अमली पदार्थावरून आठवीच्या मुलाने केली मित्राची हत्या
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गातील मुलाची निर्घृण हत्या केली आहे. अमली पदार्थांचं सेवन करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.या वादातून आरोपीनं आपल्या वर्गमित्राला संपवलं आहे. हत्येनंतर आरोपीनं आपल्या मित्राचा मृतदेह एका झाडीत टाकला होता. पण पेण पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याला बालसुधारगृहात पाठवलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि पीडित मुलगा अनेकदा शाळेला दांडी मारायचे.
दोघांना अमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं. शाळा बुडवून दोघंही निर्जनस्थळी जाऊन अमली पदार्थाचं सेवन करायचे. घटनेच्या दिवशी पीडित मुलानं आरोपीपेक्षा जास्त अमली पदार्थाचं सेवन केलं.आपल्या वाट्याचे अमली पदार्थ मित्राने घेतल्याने आरोपीचा पारा चढला. यातून त्याने अवजड वस्तूने मित्रावर हल्ला केला.डोक्याला जबर मार लागल्याने या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपीनं त्याचा मृतदेह एका झाडीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला




