जिल्ह्यातील प्रशासनाला जाब विचारण्यासाठी एकत्र येण्यापेक्षा आरोग्य सुविधा व तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्यासाठी एकत्र येणे जरूरीचे
लॉकडाऊनच्या मुद्यावर सध्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला टार्गेट केले आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन वाढल्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी निर्माण झाली हाेती त्यामुळे लोकप्रतिनिधींनी देखील लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त करून आता जिल्हा प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याशिवाय आता गणपतीत चाकरमान्यांना कोकणात आणण्याबाबतही लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. परंतु एकीकडे हे करत असताना जिल्ह्यातील काेराेना रुण्यालय व अन्य आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे याबाबत कोणीही विचारणा करीत नाही. आज रत्नागिरी शासकीय कोविड रूग्णालयात रेमडीसीवियर या इंजेक्शन बाबत अनेक आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात अद्यापही इंजेक्शनची कमतरता आहे .ती लवकरच येतील असे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी नाही.रत्नागिरीत कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. असाच दुसरा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय म्हणजे जिल्हा रूग्णालयात असलेल्या वैद्यकीय पदांबाबत. जिल्हा शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता आजही आहे. अनेक विभागात तज्ञ डॉक्टरच नाहीत. गेले पाच सहा वर्षापासून या विषयावर नेहमीच चर्चा केली जात आहे. मागील सरकारमधील आरोग्य मंत्र्यांपासून आतापर्यंतच्या आरोग्यमंत्र्यानी ही पदं लवकरच भरली जातील अशी आश्वासने दिली आहेत. मात्र प्रत्यक्षात पदे अद्यापही रिक्त असल्याने व आलेले इथे थांबत नसल्याने असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांवर कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोठा ताण आला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून आवाज उठविणे गरजेचे आहे. कोरोनाच्या बाबतीत आवश्यक असलेली किंमती औषधे व इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात कशी येतील व या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची तातडीने उपलब्धता कशी होईल यासाठी पक्षभेद बाजुला ठेऊन एकत्र येवून पाठपुरावा केला तरच यातून काहीतरी चांगला मार्ग निघू शकेल अशी जनतेची भावना आहे.
www.konkantoday.com