महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरीचा राग प्रशासनावर?
रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत जिल्हा प्रशासनाने वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या विषयावरून जिल्ह्यात मोठी नाराजी निर्माण झाली. अनेक लोकप्रतिनिधींनी या लॉकडाऊनला विरोध केला. लॉकडाऊनबाबत आम्हाला विश्वासात घेतले गेले नसल्याची महाविकास आघाडीतील इतर पक्षांची प्र्रशासनाविरोधात तक्रार आहे. जिल्ह्यात चाकरमान्यांचे आगमन होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने मोठे परिश्रम घेवून रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आवाक्यात ठेवली होती. मात्र लोकप्रतिनिधींनी चाकरमान्यांना आणण्याचा आग्रह धरल्यानंतर ही परिस्थिती बदलत गेली. राज्यात महाविकास आघाडी असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीतील म्हणजेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिल्ह्यात होणार्या कुठल्याच निर्णयाबाबत महाआघाडीतील आक्रमक असलेल्या शिवसेनेकडून साधे विचारातही घेतले जात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत कुरबूर असली तरी त्याबाबतच ते मधूनच पत्रके काढण्याशिवाय काहीही निर्णय करू शकत नाही. आता लॉकडाऊनच्या निमित्ताने प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे निमित्त होवून महाआघाडीतील घटक पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रशासनाला भेटून लॉकडाऊन कमी करण्याची मागणी केली तर कॉंग्रेस पक्षाने आता आज सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र लॉकडाऊन हे निमित्त आहे. महाविकास आघाडीत असूनही अनेक निर्णयांपासून घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नाही. ही रूखरूक आता या लॉकडाऊनच्या निमित्ताने बाहेर आली असून त्याचा राग प्रशासनावर निघत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
www.konkantoday.com