
तिलारी घाटात संरक्षक कठडा कोसळला
दोडामार्ग :- तिलारी घाटात मुसळधार पावसामुळे शनिवारी संरक्षक कठडा कोसळल्याची घटना समोर आली . तिलारी परिसरात ढगफुटी प्रमाणे पडणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी घाटात तिन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी संरक्षक कठड्या सोबत अर्धा रस्त्या खचल्याची घटना घडली आहे . घाट दुरुस्ती करून अवघ्या सहा महिन्यातच घाटाला गळती लागल्याने बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्ण चिंन्ह उभे राहिले आहे .गोव्यातून दोडामार्ग मार्गे कोल्हापूर व बेळगांवला जाण्यासाठी वाहातुकीच्या दृष्टीने तिलारी घाट एकदम जवळचा आहे. अत्यंत नागमोडी वळणे आणि अति तीव्र उतारामुळे वाहतुकीसाठी अतिशय अवघड घाट आहे . यंत्रसामग्रीचे ने-आण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा घाट तयार केला होता. गेली ३५ वर्षे हा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात होता. मात्र गेल्या वर्षीच बांधकाम विभागाने हा घाट आपल्या ताब्यात घेऊन कोल्हापूर विभागाकडे वर्ग केला. त्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. जवळपास तीन कोटी रुपये खर्ची घालून घाटातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. तर चार महिन्यापूर्वी संरक्षक कठड्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे घाटातील वाहतूक वर्षभरापासून वाढली होती. अत्यंत जवळचा रस्ता असल्याने बेळगाव व कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणी जाणारी बरीचशी वाहतूक या मार्गाने होत होती.
www.konkantoday.com