
चिपळूण येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना खासदार नारायण राणेंना अचानक भोवळ आली.
आज चिपळूण येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणेंना अचानक भोवळ आली. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सध्या ‘कृषी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या कार्यक्रमाला नारायण राणे उपस्थित होते. व्यासपीठावरून भाषण करत असताना नारायण राणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. महत्त्वाचे म्हणजे आपल्या भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात नारायण राणे यांचा आवाजही बसला होता, त्यामुळे त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. यानंतर त्यांना भोवळ आली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने आधार दिला. या घटनेनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आणि ते थेट कार्यक्रमाच्या ठिकाणाहून त्यांच्या गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. मात्र काल निवृत्तीचे संकेत आणि आज नारायण राणे यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




