
आंबेनळी घाटात दरडीचा धोका कायम
महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे घाटातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असून, नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.गेल्या १४ दिवसांत या मार्गावर चार वेळा दरड कोसळली आहे. सुरुवातीला घाट चार दिवस बंद ठेवण्यात आला होता. १५ जुलैनंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी १५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शनिवारी (दि.१९) झालेल्या मुसळधार पावसात पुन्हा दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.