
मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करून मत्स्यव्यवसायात उद्योजक निर्माण व्हावे- सुनंदा कुऱ्हाडे
रत्नागिरी: “मत्स्य संवर्धनातील बायोफ्लाॅक सारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे व त्यातून निर्माण केलेले मत्स्योत्पादन शेतकरी उत्पादक संस्थांच्या धर्तीवर मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था निर्माण करून त्यामार्फत विक्री व्यवस्था करून अधिकचा नफा मिळवावा व या जोड धंदयाव्दारे कुटूंबाला आर्थिक सुबत्ता मिळवून दयावी” असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी श्रीमती सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले. त्या मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीने आयोजित केलेल्या “बायोफ्लाॅक तंत्रज्ञान : मूलभूत ज्ञान” या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. नागनाथ भादुले, अध्यक्ष म्हणून मत्स्य महाविद्यालय शिरगाव चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे होते. मत्स्य संवर्धन विभाग प्रमुख डॉ. सुरेश नाईक, प्रशिक्षण समन्वयक डॉ. शशिकांत मेश्राम, डॉ. राजू तिबिले व डॉ. संगीता वासावे आदी उपस्थित होते.
श्री. नागनाथ भादुले यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत असलेल्या बायोफ्लाॅकसाठीच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी बायोफ्लाॅकमधील अद्ययावत तांत्रिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मत्स्य महाविद्यालय कटीबध्द असेल व त्याकरीता वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या प्रत्यक्ष उपस्थीतीच्या “बायोफ्लाॅक तंत्रज्ञान : मूलभूत ज्ञान” या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राज्यभरातून केवळ २० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली होती. प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षण कार्यक्रमात सर्वच मार्गदर्शकांनी तांत्रिक बाबींची सखोल माहिती दिली व शंकानिरसन केल्याचे आवर्जून सांगितले. तसेच आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेण्याकरीता मत्स्य महाविद्यालयाच्या संपर्कात राहू, असे सूचित केले.
या प्रशिक्षणात कार्यक्रमात बायोफ्लाॅक तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान, संवर्धन प्रकल्पासाठी जागा निवड व अभियांत्रिकीय मुद्दे, कार्बन स्त्रोतांची गरज व वापर, संवर्धन टाकी व तलाव आकारमान, बीज साठवणूक पूर्व तलाव व्यवस्थापन, प्रजैविक, आरोग्य व्यवस्थापन, अर्थ शास्त्र व प्रकल्प अहवाल या विषयी विस्तृत माहिती सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक वर्गात देण्यात आली.
यावेळी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. यावेळी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ केतन चौधरी उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शशिकांत मेश्राम तर आभार डॉ. संगीता वासावे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनिल पावसे, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. गजानन घोडे, डॉ. वर्षा भाटकर-शिवलकर, सौ. अपूर्वा सावंत यांनी विशेष सहकार्य केले तर निखिल सावंत, विक्रम कचवे, मत्स्यसंवर्धन विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व राहूल कडव यांनी परिश्रम घेतले.