पक्षीय राजकारणात विद्यार्थ्यांना वेठीस धरु नका!
अखेरच्या सेमिस्टरच्या परिक्षा रद्दचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला यासाठी केंद्रातील भाजप सरकारने अस्वस्थ होत परिक्षा होणारच! हा हटवाधी निर्णय घेत विद्यार्थांना वेठीस धरणे हे अत्यंत चुकीचे आहे.
कोरोनाच्या महामारीत सारे जग लाॅकडाऊन आहे. देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे परिणामी छोट्या जिल्ह्यांना वारंवार लाॅकडाऊन करावे लागत आहे. अनेक संस्था , महाविद्यालय इमारतींचे रुपांतर काॅरंटाईन आणि कॅटाईनमेंट झोन मध्ये झाले आहे. महाराष्ट्रातील कोरोना कहरांने चीनलाही मागे टाकले. या परिस्थितीत केंद्र सरकार युजीसीच्या माध्यमातून अखेरच्या सेमिस्टर परिक्षांची अपरिहार्यता या परिक्षा राज्य शासनाने रद्द केल्याच्या निर्णयानंतर महिनाभरापेक्षा अधिक काळानंतर जाहिर करणे हे राज्यातील आणि देशांतील लाखो विद्यार्थांना अस्थिरता आणि वैफल्यग्रस्तेच्या खाईत लोटण्यासम आहे.
एकदा अखेरच्या सेमिस्टरची परिक्षा रद्द हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाल्यावर विद्यार्थी निर्धास्त झाले, अनेकांनी आपली पुस्तके , नोटस, प्रोजेक्टस, प्रॅक्टिकल्स पुढील वर्षीच्या विद्यार्थ्यांना दिली ही, आणि अभ्यासाच्या वातावरणातून मुक्त होत पुढील शिक्षण, रोजगार, उद्योग याच्या नियोजनात व्यग्र झाले, अशा परिस्थितीत आता पुन्हा तीच परिक्षा होणारच म्हणजे थेट मानसिक आत्महत्याच अशी त्यांची अवस्था होणार.
मग त्याचवेळी राज्यपालांनी थेट हस्तक्षेप करत का निर्णय घेतला नाही. लाखो विद्यार्थांच्या मानसिकतेचा विचार नकरता मतांचा विचार करत श्रेयासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे हा केरोनापेक्षा महाभयंकर राजकीय व्हायरस आहे. याला वेळीच लगाम घालणे आता विद्यार्थी जगताच्या हातात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे सोशल मिडीयाचे अनिर्बंध साधन आहे, त्याने या परिस्थितीत व्यक्त होणे गरजेचे आहे.
अभिजित हेगशेटये,चेअरमन नवनिर्माण शिक्षण संस्था,रत्नागिरी