कोरोना प्रादुर्भाव रोखण्यामध्ये
रत्नागिरीची कामगिरी उत्तम
-गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई
रत्नागिरी दि. 08: रत्नागिरी जिल्हयातील कोरोनाची आताची संख्या, तसेच बरे झालेले रुग्ण या सगळयांचा विचार करता जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण राखण्यात यश मिळविले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी सभागृह येथे कोव्हिड १९ प्रादुर्भाव व त्याअनुंषगाने केलेल्या उपाययोजना बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्र. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. माने, प्र.जिल्हा शल्य चिकीत्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार राजन साळवी यांनी यावेळी एका कंपनीत विनापरवानगी आलेल्या 47 कामगारांचा मुद्दा मांडला असता या सर्वांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यात यावे अशा सूचना देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.
शंभुराज देसाई म्हणाले जिल्हा कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन चांगल काम करत आहे. बाहेरुन आलेल्या व होम क्वारंटाईन झालेल्या नागरिकांवर जादा नजर ठेवा. संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्धतेबाबत खबरदारी घ्या. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी जास्त डॉक्टरांची नेमणूक करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हयातील शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांबाबत, रुग्णालयातील औषधांचे उपलब्धता, इमेरजेंसी साठी बेड, ऑक्सीजनचा पुरवठा आदि बाबतची त्यांनी यावेळी आढावा घेतला.