
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात कोरोना गंभीर रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शनची टंचाई?
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरानाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालय हे जिल्ह्याचे कोविड रूग्णालय करण्यात आले आहे.गंभीर रूग्णांसाठी Remdesivir इंजेक्शन आवश्यक असते. या इंजेक्शनची किंमत ५ हजारापासून पुढे असते. पेशंटच्या प्रकृतीच्या परिस्थितीप्रमाणे हे इंजेक्शन किती द्यावयाची हे ठरवावे लागते. परंतु सध्या रत्नागिरी येथील कोविड रूग्णालयात ही इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सध्या जे पेशंट दाखल आहेत त्यातील काही रूग्णांना या इंजेक्शनची आवश्यकता आहे. परंतु ती रूग्णालयात उपलब्ध नसल्याने या पेशंटना व त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही ही इंजेक्शन बाहेरून आणावी असे सांगितले जाते. एकतर कोरोनामुळे पेशंटची अवस्था नाजूक झाली असतानाच व त्यांचे नातेवाईक चिंतेत असताना त्यांना इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे.
ही इंजेक्शन रत्नागिरीत उपलब्ध नसल्याने बाहेरून आणण्यासाठी पैसे तर खर्च करावे लागत आहेत परंतु धावाधावही करावी लागत आहे. शासनाने या इंजेक्शन खरेदीसाठी निधीही राखून ठेवला आहे. परंतु ही इंजेक्शन सध्या येथे उपलब्ध नाहीत. रूग्णालयात दाखल असलेल्या एका रूग्णाला पुणे येथून इंजेक्शन आणावे लागले. तर सिंधुुदुर्गातून काही इंजेक्शने आणण्यात आली.याची दखल तातडीने पालकमंत्री अनिल परब व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेणे आवश्यक आहे. ही इंजेक्शन तात्काळ कशी उपलब्ध होतील या दृष्टीने लगेच कार्यवाही करणे जरूरीचे आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रूग्णालयांना तातडीने इंजेक्शनचा साठा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र सध्या ते इंजेक्शन उपलब्ध नाही, अशीही रूग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com