
रत्नागिरीबहुजन समाजाचा सच्चा नेता काळाच्या पडद्याआड – श्रद्धा कळंबटे ,
आमचे ज्येष्ठ समाज बंधू ,सहकारी नंदकुमार मोहिते यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला .एक दोघांना फोन करून खात्री करून घेतली. विश्वासच बसेना.मला आजही ते दिवस आठवतात मी 1995 साली रत्नागिरीत आले .त्यानंतर 2000सालापासून सामाजिक समस्यांवर लेखनाला सुरुवात केली माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं.आणि आमच्या समाज बांधवांच्या ती गोष्ट लक्षात आली.त्यांनी स्वतःहून माझी ओळख करून घेतली यात नंदकुमार मोहिते ,विकास पेजे यांचा पुढाकार होता मी मूळची मुंबईची असल्याने रत्नागिरीतील समाज बांधवांची मला ओळख नव्हती.
या घटनेनंतर मात्र मी समाजकार्यात सक्रिय झाले .टी .एस घवाळी सरांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी भवनाच्या उभारणीत,अगदी तळागाळातील लोकांना कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्यास प्रवृत्त करण्यासाठी आम्ही रात्रीच्या बैठका घेत असू.नंदकुमार मोहिते यांच्या पुढाकाराने कुणबी समाजातील स्त्रियांच्या सामाजिक ,शैक्षणिक ,वैचारिक ,आर्थिक प्रगतीसाठी वेगवेगळ्या विषयांवर आम्ही गावोगावी बैठका घेऊन लोकांशी संवाद साधत असू. रात्री अकरा बारा वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम चालत असे विशेष म्हणजे मी एकटी महिला त्यांच्याबरोबर जात असे अशावेळी मला सुखरूप पणे नेण्या आणण्याची व्यवस्था मोहिते सर स्वतः जातीने करीत असत.
बहुजन समाजातील मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घेणं सोयीचं व्हावं याकरता त्यांनी शिवार आंबेरे येथे शामराव पेजे यांच्या नावाने कॉलेज सुरू केलं मी स्वतः या कॉलेजमध्ये बरेच वेळा मुलांच्या मार्गदर्शनासाठी गेले होते त्यावेळी त्यांचं साधंस घर पाहण्याचाही योग आला अतिशय कष्टाळू, मनमिळावू ,समाजाप्रती अतिशय प्रामाणिक आत्मीयता, प्रेम ,आपुलकी असणार असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व !कुठेही पैसा ,प्रसिद्धी याचा हव्यास नाही मला आठवतंय, एकदा तर पुण्याला समाज बांधवांच्या सभेसाठी केवळ माझ्यासाठी त्यांनी गाडी करून आम्ही काही कार्यकर्ते गेलो होतो आमच्याबरोबर सुरेश जी भायजे ,गोपीनाथजी झेपले सर हे होते नाहीतर ते बसने गेले असते यातून एका स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो मी मणक्याच्या दुखण्यामुळे लांबचा प्रवास इतर वाहनाने करू शकत नाही हे त्या मागचं प्रमुख कारण होतं . बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी जीवाचं रान करणारे जे काही कुणबी समाजातील कार्यकर्ते होते त्यापैकी मोहिते सर हे एक निस्वार्थी कार्यकर्ते !खरंतर मी राजकारणात सक्रिय व्हावं अशी त्यांची खूप मनापासून ची इच्छा होती समाजाच्या माझ्याकडून याबाबतीत खूप अपेक्षा होत्या परंतु मी त्या पूर्ण करू शकले नाही कारण तो माझा पिंड नाही आणि हे मी सर्वांना परोपरीने पटवून दिलं की मी जरी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही तरी बहुजन समाजाच्या सामाजिक प्रश्नांसाठी तुम्ही मला कधीही आवाज द्या मी तत्पर असेन आणि गेली 35 वर्षेआणि शेवटच्या श्वासापर्यंत माझं हे कार्य सुरूच राहील.
यानंतर माननीय कोळसे पाटील सर, विश्वनाथजी पाटील यांनीही माझं मतपरिवर्तन करण्याचा खूप प्रयत्न केला मला आमदारकीचं तिकीट देण्याचा त्यांचा मानस होता .परंतु मी त्यांना नम्रपणे नकार दिला त्यानंतर मोहिते सर स्वतः त्यावर्षी निवडणुकीला उभे राहिले. हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने त्यांच्या पदरी अपयश आले परंतु या अपयशाने खचून न जाता पुन्हा ते नव्या जोमाने निवडणुकीला सामोरे गेले आणि शेवटच्या श्वासापर्यंत विविध पदांवर काम करून जनतेची सेवा करीत राहिले. एखादा निष्कांचन कार्यकर्ता त्याची सामाजिक बांधिलकी जर प्रामाणिक असेल तर तो इतिहास घडवू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नंदकुमार मोहिते!
आमच्या समाजाचे आदरणीय मंत्री महोदय शामरावजी पेजे आणि ल .रा .हातनकर सर यांचा सहवास मला अगदी फारच थोडा काळ लाभला.जर या व्यक्तींचा सहवास मला अधिक काळ लाभला असता तर कदाचित माझा जीवन प्रवास काही वेगळाच झाला असता.मामी भुवड, तु .बा.कदम,शिवाजीराव जडयार यांना तर मी फक्त नावानेच ओळखते.मोहिते सरांच्या सहवासात मात्र सुरेश भायजे सर, गोपीनाथ झेपले सर ,चंद्रकांत परवडी ,टी एस घवाळी सर, सुजित झिमण सर, विकास पेजे ,चंद्रकांत बावकर सर ,तानाजी कुळये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील असंख्य प्रमुख समाज कार्यकर्त्यांची ओळख झाली प्रत्येक तालुक्यात गावोगावी आपल्या समाजापर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळाली त्या त्यावेळी मी माझ्या लेखनातून त्या त्या वेळच्या सामाजिक विषमतेवर आवाजही उठवला आहे. परंतु ज्यावेळी समाजाने राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र मी माघार घेतली आणि केवळ सामाजिक समस्या सोडवण्यासाठी मी समाजाची बांधिलकी स्वीकारली आज मोहिते सर जरी आमच्यात नसले तरी त्यांचे विचार ,त्यांची धडाडी, त्यांची सामाजिक बांधिलकी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील आणि त्यांचे हे कार्य आपण सर्वांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
श्रद्धा कळंबटे ,रत्नागिरी