
मिर्या बंधारा दुरुस्तीच्या मंजुरीसह निधी लवकरात लवकर देणार जिल्हाधिकार्यांची ग्वाही; बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली भेटले शिष्टमंडळ
रत्नागिरी -जाकीमिर्या पाटीलवाडी आणि शेट्येवाडी या बंधार्याच्या दुरुस्तीकरिता प्रस्तावाप्रमाणे आवश्यक निधी लवकरात लवकर मंजूर करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मिर्यावासीयांना दिली. माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज जिल्हाधिकार्यांना भेटले. त्यावेळी श्री. मिश्रा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मिर्या बंधारा दुरुस्तीला निधी मिळण्याकरिता मिर्यावासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर 14 ऑगस्टला धडकणार होते. मात्र जिल्हा नियोजन मंडळाची सभा व स्वातंत्र्यदिन या पार्श्वभूमीवर ही भेट पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारी 17 ऑगस्ट 2020 रोजी मिर्यावासीयांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकार्यांना भेटले. या वेळी माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विकास सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस (संघटन) राजेश सावंत यांनी मिर्यावासियांचे दुःख मांडले. उधाणाची भरती येत असल्याने व तिथेच बंधारा वाहून गेल्याने ग्रामस्थ भयभीत असल्याचे सांगितले.
या वेळी विरेश भुते, कृष्णा शिवलकर, नागेश शेट्ये, मनोज शिरधनकर, राजू तांडेल, दत्तगुरु कीर, जि. प. चे माजी शिक्षण सभापती विजय सालीम, महेश सुर्वे, तनया शिवलकर, ययाती शिवलकर, नेहा भाटकर, बाबा भुते, रूपेश सनगरे नागेश कांबळे, मारुती आंब्रे, नीलेश कीर, रूपेश पाटील, सुशांत सुर्वे, मिलिंद नार्वेकर, हेमंत शेट्ये, बनप गुरुजी, राकेश मयेकर हेसुद्धा उपस्थित होते.
जिल्हा नियोजनमधून जानेवारीत मंजुरी मिळूनही निधी उपलब्ध होऊन दुरुस्ती सुरू न झाल्याने ग्रामस्थ नाराज होते. त्यामुळेच मिर्यावासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार होते. निधी तत्काळ मिळून काम सुरू व्हावे, याकरिता माजी आमदार बाळ माने यांनी जिल्हाधिकार्यांकडे पत्र पाठवले होते. बंधारा दुरुस्तीसाठी 99.75 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मिर्या येथे सुमारे साडेतीन किमी लांबीचा टेट्रापॉड्स व ग्रोयनचा धूपप्रतिबंधक बंधारा करण्याबाबत मार्च 2019 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विभागाने तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 189.67 कोटी रक्कमेला प्रशासकीय मान्यता दिली. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली, यासंदर्भातही माने यांनी चर्चा केली.
www.konkantoday.com