
यापुढे मराठीचा वापर न केल्यास सरकारी अधिकाऱयांची वेतनवाढच रोखली जाणार
सरकारी कार्यालये तसेच महापालिकांना वारंवार सूचना दिल्यानंतरही प्रशासकीय कामात मराठीचा वापर केला जात नाही. लॉकडाऊनच्या काळातील सूचनाही इंग्रजीतूनच प्रसिद्ध करण्यात आल्या. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. यापुढे मराठीचा वापर न केल्यास सरकारी अधिकाऱयांची वेतनवाढच रोखली जाईल, असे आदेश राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून काढण्यात आले आहेत.महाराष्ट्रात मराठी अनिवार्यच असायला हवी असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे. त्यानुसार सरकारी आदेश, परिपत्रके यात मराठी भाषेचाच वापर व्हायला हवा. यासाठी सरकारकडून अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मधल्या काळामध्ये लॉकडाऊनमधील उपाययोजनांच्या सूचना, कोरोना संदर्भातील सूचना याही इंग्रजीतच प्रसिद्ध झाल्या होत्या. याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. यापुढे कोणतेही आदेश किंवा परिपत्रक मराठीतच प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
www.konkantoday.com