परिवहन मंत्री अनिल परब यांनी सर्व वारकऱ्यांना पैसे परत दिले जातील अशी घोषणा केली
नाशिक येथून संत निवृत्ती महाराजांच्या पालखीसोबत एसटी बसने पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांकडून प्रवासाचे तब्बल ७० हजार रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही अतिशय चुकीची बाब आहे. त्यामुळे मी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्याला चौकशी करुन ज्याने चूक केली आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत’, असं अनिल परब यांनी सांगितलं
‘संतांच्या पालख्या पंढरपुरला नेण्याचं भाग्य एसटीला लाभलं होतं. त्याबाबत मी एसटी महामंडळाला सूचनादेखील केल्या होत्या.याशिवाय वारकऱ्यांचा येण्याजाण्याचा सर्व खर्च शासन करेल, असंही सांगितलं होतं. पण काही गैरसमजातून नाशिकहून निवृत्ती महाराजांच्या पालखीसोबत पंढरपुरला गेलेल्या वारकऱ्यांकडून पैसे घेतल्याची माहिती मिळाली आहे’, असं अनिल परब म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या ट्विटनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी सर्व वारकऱ्यांना पैसे परत दिले जातील, अशी घोषणा केली
www.konkantoday.com