
घुडेवठारच्या गोविंदा पथकाने अवघ्या 7.15 सेकंदात लावले पाच थर, रत्नागिरीतल्या श्री प्रतिष्ठानची हंडी फोडली
रत्नागिरी : अवघ्या 7.15 सेकंदात सरसर पाच थर लावत दत्तप्रासादिक गोविंदा पथक घुडेवठारने श्री प्रतिष्ठान आयोजित मानाची दहीहंडी फोडली. यावेळी प्रचंड जल्लोष करण्यात आला.
उद्योगमंत्री उदय सामंत प्रायोजित व श्री प्रतिष्ठानकडून रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. उदय सामंत यांनी स्वत: उपस्थित रहात गोविंदा पथकांचे मनोधैर्य वाढवले. रत्नागिरीतील नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी या मैदानावर केली होती. तब्बल 21 गोविंदा पथकांनी या ठिकाणी येऊन सलामी दिली. रत्नागिरी शहरातीलच दत्तप्रासादिक गोविंदा पथक व खालचा फगरवठार येथील गोविंदा पथकामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी अंतिम लढत झाली. यात दत्तप्रासादिक गोविंदा पथक घुडेवठारने 7.15 सेकंदात पाच थर उभारुन दहीहंडी फोडली. तर दुसरा क्रमांक फगरवठार येथील पथकाला मिळाला. त्यांनी 8.23 सेकंदात दहीहंडी फोडली. प्रथम क्रमांक पटकावणार्या दत्तप्रासादिक गोविंदा पथकाला 51 हजार व चषक देऊन गौरवण्यात आले तर उपविजेत्या फगरवठार संघाला 25 हजाराचे रोख पारितोषिक व चषक देण्यात आला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. यावेळी बाबू म्हाप, तुषार साळवी, राजन शेट्ये व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.