घरगुती ग्राहकांनी जून महिन्यात आलेले बिल एक रकमी भरल्यास दोन टक्क्यांची सवलत
जून महिन्यात आलेल्या वाढीव वीज बिलामुळे हैराण झालेल्या महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे घरगुती ग्राहकांनी जून महिन्यात आलेले बिल एक रकमी भरल्यास दोन टक्क्यांची सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा मांगवळारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. तसेच बिल तीन समान हप्त्यामध्येही भरता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊननंतर महावितरणने जादा वीजबिले पाठवली असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. त्याचे ऊर्जामंत्र्यांनी खंडन केले. लॉकडाऊनमध्ये वीज आयोगाच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या वीज वापराचे मीटर रिडींग बंद होते. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात वीज वापर वाढलेला असतानाही सरासरी रीडिंगमुळे फेब्रुवारीच्या वीज वापराप्रमाणे कमी बिले दिली. मात्र जूनमध्ये प्रत्यक्ष रिडींग झाले तेव्हा ज्यादाचा वीज वापर रीडिंगमध्ये नोंदल्याने ग्राहकांना वीज बिल वाढीव आली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. वाढीव बिलाचा भार ग्राहकांवर पडू नये म्हणून तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात न जाता बिल भरणा केंद्रावर जाऊन एक तृतीयांश रक्कम भरता येणार आहे. तसेच ज्या ग्राहकांचा मागील तीन महिन्यात वीज वापर नाही, पण सरासरी बिलिंगमुळे त्यांना बिल पाठवले असेल तर ते दुरुस्त करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहे.
वीज बिलाबाबत ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या सर्व विभागीय कार्यलयात ग्राहक मदत कक्षाची स्थापना करण्याचे निर्देश उर्जामंत्र्यांनी दिले आहे.
www.konkantoday.com