‘रमेश कीर कला अकादमी’च्या नवव्या वर्धापन दिनाला दिग्गज्यांनी दिल्या ऑनलाईन शुभेच्छा
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रमेश कीर कला अकादमी ही सिने-नाट्य क्षेत्रातील शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारी कोकणातील एकमेव अकादमी असून ही अकादमी सिनेनाट्य क्षेत्रातील उत्तम आणि सर्जक कलाकार घडण्यासाठी गेली ९ वर्ष प्रयत्न करत आलेली आहे.विद्यार्थ्यांचा कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि एकूणच प्रायोगिकता,नाविन्य आणि आत्मशोधाकडे नेणारं शिक्षण अकादमीत दिलं जातं.वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांनी करून बघितले पाहिजेत आणि कोकणातल्या रंगभूमीला जागतिक रंगभूमीपर्यंत नेऊन पोहोचवलं पाहिजे या ध्येयाने प्रयत्न करणा-या अकादमीने यावर्षी २८ जूनला ९ वर्षे पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण केले. गेली ९ वर्षे सिने -नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांच मार्गदर्शन आणि सुसंवाद अकादमीला नेहमीच प्रगतीची वाट दाखवत राहीला आहे.आतापर्यंत घाशीराम कोतवाल,महापूर,ती फुलराणी,जत्रेतलं जायंटव्हील अश्या वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं,युट्युबवरच्या मालिका असे बरेच प्रयोग कला अकादमीने सातत्याने केलेले असून अकादमीतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले बरेच विद्यार्थी चित्रपट,मालिकांमध्ये चमकत आहेत.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी एक मोठा कार्यक्रम अकादमी आयोजीत करते ज्यामध्ये सिनेमा किंवा नाटकात सध्या कार्यरत असणारे दिग्गज कलाकार अकादमीला भेट देतात. नाट्यकलेचा उद्देश,ते शिकण्याचा उद्देश आणि या सगळ्या प्रशिक्षणाचा व्यावसायिक कला क्षेत्रात कसा उपयोग होईल या दृष्टीने ते सगळे दिग्गज कलाकार येऊन मार्गदर्शन करत असतात. असा हा सोहळा दरवर्षी होत असतो पण सध्या असणा-या कोरोनाच्या संकटामुळे कोणताही खुला कार्यक्रम न घेता ऑनलाईन “खुल्या मराठी नाट्यलेखन स्पर्धेचं” आयोजन केलं होतं. या नाट्यस्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला असून यामध्ये एकूण ४२ नाटकांचा समावेश होता.त्यातून उत्तम अशा तीन नाटकांची निवड परीक्षकांनी केलेली आहे.ती अनुक्रमे
प्रथम क्रमांक-‘निर्वाण’,लेखक -उदय नाईक,गोवा
द्वितीय क्रमांक-‘जाळ्यातील खिळे’ लेखक-शंतनू आडसूळ,पुणे.
तृतीय क्रमांक-‘जनरेशन प्लस प्लस’ लेखिका-श्रेया पांचाळ,रत्नागिरी ही आहेत.
यामध्ये ब-याच नवीन तरूण नाटककारांनी संहिता पाठवल्या होत्या याचे एक विशेष समाधान अकादमीला वाटलं.या स्पर्धेच्या परीक्षणाचं काम प्रसिद्ध प्रायोगिक नाटककार “डाॅ.हिमांशू स्मार्त” आणि रमेश कीर कला अकादमीचे विभाग प्रमुख “प्रदीप शिवगण” यांनी केले.
वर्धापन दिनानिमित्त अकादमीला डाॅ.नितीन चव्हाण ह्यांनी १५ पुस्तके भेट दिली तसेच लेखक नाटककार अनिल दांडेकर ह्यांनी 20 पुस्तके भेट दिली असून सागर जंगम ह्या कलाप्रेमींने भेट म्हणून अकादमीला वेबसाईट बनवून दिली(rameshkeerkalaacademy.com)
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे औचित्य साधून नाटककार प्रेमानंद गज्वी, डॉ. हिमांशू स्मार्त सिने दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई, डॉ. शरद भुतथाडीया, डॉ. प्रविण भोळे इ. अनेक दिग्गजांनी व्हिडीओ क्लिप्स पाठवून अकादमीच्या कामाची दखल घेऊन कौतूक केले. कला अकादमीच्या फेसबुक पेजवर अपलोड करून त्या सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या.
स्पर्धकांनी घेतलेल्या सहभागाबद्दल आणि या सर्व मान्यवरांनी आपला वेळ देऊन व्हिडीओज पाठवल्याबद्दल विभाग प्रमुख प्रदीप शिवगण यांनी आभार मानले आणि स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक आणि अभिनंदनही घेतले.
www.konkantoday.com