कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा
रत्नागिरी दि.30:- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना 2020 आणि भादवि 1973 च्या कलम 144 नुसार ठोस उपाय योजना म्हणून कोरोना विषाणू साखळी तोडण्यासाठी 01 जुलै 2020 ते 8 जुलै 2020 (दोन्ही दिवस धरुन) लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले आहेत.
याअतंर्गत कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी जिल्ह्याच्या सिमा या कालावधीत बंद असतील सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद राहील.
अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने व आस्थापना वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. पाच पेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे व सामाजिक अंतर (6 फूट) ठेवणे बंधनकारक आहे. दुकानात एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना बंदी आहे. मोठ्या प्रमाणात जमाव जमेल अशी कोणतीही कृती करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे असे केल्यास कायदेशीर शिक्षा करण्यात येईल.
कामाच्या ठिकाणी थर्मल, स्कॅनर, हात धुण्याचा साबण सॅनिटाइझर ठेवणे सुरु राहणाऱ्या आस्थापनांच्या प्रमुखांवर बंधनकारक असेल. कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वापराच्या जागांचे निर्जंतुकीकरण देखील बंधनकारक असेल.
सुरु काय राहणार
आपत्ती व्यवस्थापन आणि अत्यावश्यक सेवांच्या आस्थापना व कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह तर अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालये 10 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.
पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा आणि स्वच्छता करणाऱ्या यंत्रणा तसेच बँका, टपाल, कुरियर, दूरध्वनी आणि इंटरनेट पुरविणाऱ्या आस्थापना, ऑनलाईन शिक्षण, आय.टी. आस्थापना, ई-कॉमर्स जसे ॲमेझॉन यांच्या सेवा सुरु राहतील.
अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, दूधाचे पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरु राहतील. मांस/मासे आणि अंडी यांची दुकाने बुधवार, शुक्रवार व रविवारी सुरु राहतील.
रुग्णालये, वैद्यकीय आस्थापना, मेडिकल दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने व देखभाल केंद्र तसेच पाळीव प्राण्यांची पशुवैद्यक आस्थापना व दुकाने सुरु राहतील. सर्व प्रकारचे उद्योग व त्यासंबंधी असणाऱ्या व्यवसायाच्या आस्थापना ऑईल, गॅस व ऊर्जा संसाधनांच्या आस्थापना व गोदामे सुरु राहतील.
प्रसारमाध्यमे व इलेक्ट्रॉनिक मिडीया सुरु राहील. शासकीय कामे, शेती कामे, कृषीमाल प्रक्रिया व साठवणूक सर्व बंदरे व त्याच्याशी निगडीत बाबी सुरु राहतील. अंत्यविधीसाठी कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेत 20 जणांसाठी परवानगी असेल.
मद्यविक्री ऑनलाईन मागणी स्विकारुन घरपोच सेवा सुरु ठेवता येईल.
निसर्ग चक्रीवादळाच्या पुर्नबांधणी, पंचनामे व मदत वाटप याच्या आस्थापना सुरु असतील.
ज्या घटकांना सुरु ठेवण्याची मुभा आहे त्यांनी अत्यावश्यक बाबीसाठी ओळखपत्र व वाहनावर स्वयंघोषित फलक लावून प्रवास वा वाहतूक करता येईल.
अत्यावश्यक सेवा व त्यांच्या आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरु असतील. सायंकाळी 5 ते सकाळी 9 या कालावधीत केवळ वैद्यकीय तपासणी खेरीज घराबाहेर पडता येणार नाही. याखेरीज कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे बंधनकार राहील*