
सिव्हिलमधील मृतदेहाच्या प्रकाराबाबत ना. उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली, जिल्हाधिकारी यांचे चौकशी समिती नेमण्याचे आदेश
रत्नागिरी शासकीय रूग्णालयात कोंड, ता. राजापूर येथील प्रौढ व त्याची पत्नी यांना ताप आल्याने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दोघांचेही स्वॅब घेण्यात आले होते. पत्नीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह तर पतीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. या दोघांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्याने या प्रौढाचे शुक्रवारी उपचाराच्या दरम्याने निधन झाले. मृत्यूच्यावेळी या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी नातेवाईकांना कळवले. व रत्नागिरीतच अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन नातेवाईकांना उपस्थित राहण्यास सांगितले. त्याप्रमाणे नातेवाईक दाखल होताच मृताचा अहवाल निगेटीव्ह असून चुकून पॉझिटीव्ह सांगितल्याचे प्रशासनाने सांगितले.
यामुळे नातेवाईक संतप्त झाले. गावातील लोकांचे आम्हाला सहकार्य मिळणार नाही असे म्हणत त्यांनी रत्नागिरीतच अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला. परंतु सिव्हिल प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने असमर्थता दाखविली. त्यामुळे हा मृतदेह दोन दिवस शासकीय रूग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला. या प्रकारावर नातेवाईक व सिव्हिल प्रशासन यांच्यात वादावादी झाली. शेवटी रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने पुढाकार घेत या मृतावर अंत्यसंस्कार केले होते. नुकत्याच झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत हा मुद्दा एका पत्रकाराने उपस्थित केला. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सिव्हिल प्रशासनाने या प्रकाराबाबत काहीही कळविले नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यावर ना. उदय सामंत यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकार्यांना केली. जिल्हाधिकार्यांनी देखील या प्रकाराची संबंधितांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल असे जाहीर केले. त्यामुळे आता मुंबईनंतर रत्नागिरीतही आरोग्य यंत्रणेकडून असे प्रकार घडू लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com