परिचारिका …एक अनमोल सेवा
परिचारिका ( नर्स )..एक अनमोल सेवा –प्रा.आनंद आंबेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी
Blog-
https://anandambekar95.blogspot.com/?m=1
आरोग्य सेवा..पोलीस खाते ..सफाई सेवा यांना .. हल्लीच आपण कोरोनायोद्धा म्हणून घराच्या बाहेर येऊन टाळ्या वाजवल्या. यामध्ये हॉस्पिटलमध्ये सतत कार्यक्षमपणे कार्यरत असणाऱ्या परिचारिका यांचे कार्य अनमोल आहे.माय लाईफ …यामाझ्या ब्लॉग मध्ये आज लिहीत आहे. नर्सचा माझ्या जीवनाशी खुप जवळचा संबंध आहे. एक माझ्या जन्मापूर्वीपासूनचा संबंध असलेली *अंबुताई* … आई-अण्णाच्या खुप जवळचे संबंध असलेली …. गावामध्ये टीका लावणे ..आरोग्यविषयक तपासणी करणे .. पण या पेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणून घरात सतत अंबुताईचा उल्लेख व्हायचा. गावमळा येथे रहायची. आंबेड पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर …पण नेहमी चालत यायची कोळंबे.. सोनगिरी.. नंतर आंबेड ..मग आमच्या घरी आल्यावर पान खाणे आणि गप्पांचा कार्यक्रम असायचा. खरं म्हणजे आजही आरोग्यसेविका आहेत पण अंबुताई सारखी सेवाभावी नर्स पाहिलीच नाही.माझ्या जन्माची कथा मी आई कडून खुप वेळा ऐकली आहे. माझा जन्म होण्याची दिवशीची घटना …..पहाटे 3 वाजले होते आईच्या पोटात दुखु लागलं होतं ..एव्हढ्या रात्री अंबुताईला बोलवायचं कसं ? असा मोठा प्रश्न अण्णांच्या फक्त मनात आला ..तो पर्यंत रघुतात्या आणि मोतीराम तात्या (मी दादाच म्हणतो त्याला कारण आईच्या नात्याकडून मावशीचा मुलगा म्हणून ) लगेच तयार झाले. काही गाडी वैगेरे नव्हती …दोघांचा पायी प्रवास सुरु झाला त्यांची चर्चा एकच.. एव्हढया रात्री अंबुताईला उठवायच कसं ..घराच्या दारात पोहचले तर घरात आवाज येत होता पहाटेचे ४ वाजले होते . दार उघडे तर लगेच अंबुताई म्हणाली हे बघा आंबेकर गुरुजींनी माणसं पाठवली आहेत. ताई जागी झाली ती तिच्या स्वप्नामुळे ..त्यामध्ये माझी आईची डिलिव्हरी ची वेळ झाली आहे आणि ती अडचणीत आहे असं तिच्या स्वप्नात आलं होतं आणि ती दचकून उठून घरात बोलत होती .. आंबेकर गुरुजींच्या पत्नीची डिलिव्हरी ची पण तारीख जवळ आली आहे …आणि तितक्यात माझे दोन्ही तात्या दारात उभे होते . …एक नर्स म्हणून मनापासून आरोग्य सेवा केल्याने तिची तळमळ दिसून येत होती ….आणि तो पाई प्रवास करून अंबुताई आमच्या घरी आली. माझा जन्म झाला. … पण जन्म झाल्यावर तेव्हा माझी हालचाल होत नव्हती.दोन मुलीनंतर मुलगा झाला म्हणून आनंद होता ..पण हालचाल नव्हती म्हणून पूर्ण घरात सन्नाटा होता.त्यावेळी केवळ अंबुताईने प्राथमिक उपचार केले ..म्हणून आज मी आहे …माझ्या रडण्याचा आवाज आला …आणि स्तब्ध झालेल्या घरामध्ये आनंदाची उत्सव सुरू झाला.त्यामुळे अंबुताई ही माझ्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व असणारी नर्स आहे.
दुसरी नर्स म्हणजे माझी पत्नी *गौरी* तिच्यामुळे आयुष्यात आरोग्यविषयक खुपच शिस्त आली आहे.(अनेक वेळेला ती शिस्त जाचक वाटते) ..पण घरातील अनेक आरोग्यविषयक घटनांमुळे संपुर्ण घर तिला फोल्लो करत असत. वडिलांना 2007 ला ब्रेन इन्फ्राक्ट झाला होता …पण केवळ तिच्या समयसुचकतेमुळे अर्धांगवायु होण्यापासून वाचले आणि 2012 पर्यंत स्वतः चालत फिरत होते.2012 लाच आईला अचानक घशाखाली दुखु लागलं गौरीच्या लक्षात आलं की हे दुखणं नेहमीच वाटतं नाही …हॉस्पिटलमध्ये आईला घेऊन गेल्यावर कळलं की तिला लुडविंग अन्जायना झाला आहे …आता या रोगाचा नांव मी कधी आयुष्यात ऐकलं नव्हतं ..पण हे न ऐकलेल्या रोगाने आईच आयुष्य धोक्यात आणलं होत. घश्यातील ग्रंथींना इन्फेक्शन होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. आणि हे इन्फेक्शन वाढत जाऊन जीव धोक्यात आला असता ..आईचा पूर्णजन्मच म्हणावा लागेल कारण नॉनमेडीलक व्यक्तींना तो जीवघेणा श्वसनाचा आजार आहे हे कळलेच नसते….आणि म्हणूनच घरामध्ये केवळ नर्स असल्याने आज मला जन्म देणारी आई 80 वर्षापर्यंत उत्तम जीवन जगत आहे.
आयुष्य परत देणारी अंबुताई (आज त्या हयात नाहीत )
आणि आयुष्यभर सोबत राहणारी पत्नी गौरी ..या दोन्ही नर्समुळे परिचारिका यांचे कार्य स्पेशल वाटते…आणि म्हणूनच पी.एच.डी. च्या अभ्यासाचा विषय *परिचारिका* घेऊन अतिशय आत्मियतेने गेली ९ वर्ष अभ्यास करीत होतो.
परिचारिका …. एक अनमोल सेवा ..