
कोरोना प्रसाराच्या या गंभीर वळणावर शासन आणि प्रशासन यांनी संवेदनशील आणि जागृत राहणे अपेक्षित
रत्नागिरी लॅब मधील टेस्टिंग कीटचा तुटवडा दि.२३ तारखेपासून प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित अशा बातम्या प्रसिद्ध होणे याचा अर्थ प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये विसंवाद आहे. टेस्टिंग कीटची कमतरता पडली तर आक्रमक व्हावे लागेल व त्याच्या परिणामांची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाची असेल असा सज्जड इशारा अॅड. दीपक पटवर्धन भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी दिला. परिस्थिती तशी नसेल तर त्याबाबत स्पष्ट खुलासा करणे आवश्यक होते. मात्र दोन तासांपेक्षा अधिक काळ ही बातमी फिरते आहे मात्र खुलासा नाही याचा अर्थ ती कमतरता आहे असाच होतो. हा विषय गंभीर असून याबाबत आपण मा. देवेंद्र फडणवीस तसेच तसेच मा. प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेते यांचे जवळ संपर्क केला आहे. तसेच जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनाही पत्र दिले आहे.
स्वॅब टेस्टिंग लॅब सद्यस्थितीत खूप महत्त्वाची आहे. प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असणारे टेस्टिंग या लॅब मार्फत अविरत सुरू राहणे आवश्यक आहे.
वाढती संख्या पाहता पुरेसे डॉक्टर्स उपलब्ध असणे, व्हेंटीलेटर उपलब्ध असणे आणि हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढवणे गरजेचे आहे. याकडेही आपण लक्ष वेधले आहे असे अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले.