
गिफ्टकॅशचे आमिष दाखवून नाचणे येथील महिलेची २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुम्हाला फोनपे ऍपवर गिफ्ट कॅशबॅक लागले आहे, असे आमिष दाखवून रत्नागिरी शहरातील नाचणे शांतीनगर येथील पद्मावती पार्कमध्ये राहणार्या ऐश्वर्या शरद धामापूरकर या महिलेची दिपककुमार नाव सांगणार्या अनोळखी इसमाने १९,९९६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी ऐश्वर्या या घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर मुंबईतून दिपककुमार बोलतोय असे सांगणार्या इसमाचा फोन आला. त्याने तुम्हाला फोनपे ऍपवर गिफ्ट कॅशबॅक लागले आहे. कॅशबॅक रिमीड करण्यासाठी ४९९९ रुपयांचे ट्रान्झेक्शन करावे लागणार आहे असा मेसेज पाठवला. त्याप्रमाणे फिर्यादी ऐश्वर्या यांनी मोबाईलद्वारे पैशाचे ट्रान्झेक्शन केले. तरीही गिफ्टकॅशचे पैसे फिर्यादी यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्याने फिर्यादी यांनी आरोपीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता आरोपीने आणखी त्यांना पैसे ट्रान्झेक्शन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी एकूण १९,९९६ रुपये आरोपीच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. तरी देखील गिफ्टकॅशची रक्कम जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी ऐश्वर्या यांनी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com