
संगमेश्वर रेल्वे स्थानकावर सुभोभिकरणाचा लोकार्पण सोहळा झाला पण संगमेश्वरवासियांच्या तीन ट्रेन थांब्या मागणीचे काय? संगमेश्वरवासियांमधून उपस्थित होतोय सवाल; मागण्या पूर्ण करा कोकण रेल्वे प्रशासनाकडून संगमेश्वरवासियांची अपेक्षा
संगमेश्वर- संगमेश्वर रेल्वे स्थानकावर काळ सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा शानदार पार पडला… त्याचे निश्चित स्वागतच!! परंतु जनतेला नेमके काय हवे आहे…त्याना नेमक्या अडचणी काय? किती गाड्या या स्थानकावर थांबतात??त्या सोयीच्या आहेत का?? याचा विचार स्थानिक लोकप्रतिनिधी व कोंकण रेल्वे प्रशासन कधी करणार ? असा सवाल प्रवासी जनतेतुन केला जात आहे . ▪️संगमेश्वर रेल्वे स्थानक रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि रत्नागिरी या मुख्य स्थानकांच्या दरम्यान असणारे मध्यवर्ती स्थानक!! परंतु या दोन्ही स्थानकांच्या तुलनेत संगमेश्वरला नेहमीच सापत्नभावाची वागणुक मिळाली आहे. कोणत्याही गाडीचा थांबा हवा असेल तर संघर्षाला पर्याय नाही… प्रवाशाना कोणत्याही सोयी सुविधा हव्या असतील तर अंदोलनाचे इशारे द्यावे लागतात; प्रसंगी ती करावी लागतात. संगमेश्वर प्रमाणेच कोंकणातील रत्नागिरी वगळता बाकीच्या स्थानकांची अवस्था तीच! संगमेश्वर ला रेल्वे गाड्यांचे थांबे असोत वा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न… इथे संघर्ष करणारी एकमेव संघटना म्हणजे निसर्गरम्य चिपळुण व संगमेश्वर!! या संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या स्थानकावर अनेक सुविधा आजपर्यंत मिळाल्या आहेत. नेत्रावती एक्सप्रेस सह नागपुर मडगांव; उधना मंगलोर या गाड्याना थांबे मिळाले आहेत. हे नाकारुन चालणार नाही…. पण…पण गेले काही महिने हि संघटना काही लांब पल्ल्याच्या गाड्याना संगमेश्वर ला थांबा मिळण्यासाठी धडपड करत आहे. स्थानिक आमदार श्री शेखर निकम यांच्या पुढाकाराने रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबर बैठक होते… त्या बैठकीत मागणीपत्रातील ९ पैकी ३ गाड्याना थांबा मिळेल असा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला जातो. पुढील काही दिवसात कोंकण रेल्वे प्रशासन सकारात्मक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवते (दि ३० जुलै) खर तर पुढील १५/२० दिवसात त्या प्रस्तावाला मंजुरी अपेक्षित असते… संघर्ष करणा-या संघटनेसह अवघा तालुका या मंजुरीसाठी वाट पहात असतो… त्यातच आचारसहिंता कधीही लागण्याची टांगती तलवार डोक्यावर असते… जवळपास साडेतीन महिने होवुन देखील प्रस्ताव मंजुर किंवा नामंजुर याबद्दल कोंकण रेल्वे प्रशासनाकडुन जनतेला सांगितले जात नाही… राजकारणी असो किंवा प्रशासन… जनतेला गृहित धरण्याची परंपरा खंडित होत नाही.गेल्या काही दिवसात संगमेश्वर रेल्वे प्रवाशांमध्ये झालेली जागरूकता पाहता दिवसेंदिवस येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच असुन उत्पन्नाचे आकडे सुद्धा कमालीचे वाढताना दिसत आहेत. संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन मधून चालू वर्षातील पहिल्या फक्त 6 महिन्याच एकूण उत्पन्न 3 कोटी 9 लाख दिले आहे तसेच गणेशोत्सवातील सप्टेंबर महिन्यात सुमारे 85 लाखांचा महसूल प्रवासी वाहतुकीतून या स्थानकला देऊनही आपल्याला 3 ट्रेन चा थांबा नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.मध्यंतरी पश्चिम उपनगरातुन कोंकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी बांद्रा मडगाव गाडीची घोषणा झाली. ती गाडी सुरुही झाली परंतु त्या गाडीला चिपळुण रत्नागिरी शिवाय जिल्ह्यात इतरत्र थांबेच नाहीत… संघर्ष करणारी संघटना गाफिल आहे अस गृहित धरुन हि गाडी सुरु होते… उद्घाटनाला “कोंकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी” अशा ठळक शिर्षकाखाली फलक लागतात पण नेमके कोणत्या प्रवाशाना गृहित धरुन हि गाडी सुरु झाली हे फक्त कोंकण रेल्वेच जाणे!! या गाडीला खेडला थांबा मिळण्यासाठी सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी एकत्र येवुन कोंकण रेल्वे ला इशारा देतात… मात्र संगमेश्वर ला कुणाचा कुणाला मेळ नसल्याची अवस्था!