
टिळक आळी मित्र मंडळाकडून दापोलीतील नुकसानग्रस्त १०० कुटुंबांना अत्याआवश्यक सामानाचे वाटप
निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या गावांना मदत करण्यासाठी आम्ही दिनांक २१/०६/२०२० रोजी दापोली शहारा पासून जवळ असलेल्या गावांना मदत करण्यास बाहेर पडलो. जाता जाता वाटेत असणाऱ्या गावांची निसर्ग वादळाने केलेली वाताहत आमच्या नजरे समोर दिसत होती, पालंदे, पाज पंढरी गावांची झालेली अवस्था खूप बिकट होती.नारळी, पोफळी बागा पूर्ण नष्ट झाल्या होत्या वाटत होत की ही गाव आता कशी उभी राहणार पण आपला कोकणी माणूस गप्प कसा बसणार तो त्याच जोमाने आलेल्या परस्थितीला तोंड देण्यासाठी उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, वाटेत लाईट चे पोल, डीपी, ट्रान्सफॉर्रमल अगदी वादळाने पिरगटून टाकले होते, घरांची कौले, पत्रे, लोखंडी अँगल वाऱ्याने २० ते ३० फूट लांब उडाले दिसत होते. एक एक अंतर पार करत आम्ही आंजरले गावात पोचलो तेथील अवस्था तर याहून भीषण होती सगळ्या बागा पूर्ण नष्ट झाल्या होत्या, तेथील माजलेकर या कार्यकर्त्याला आम्ही भेटलो व आम्हाला काही लोकांना मदत करायची आहे सांगितले असता त्यांनी आम्हाला आंजरले गावापासून जवळ असलेल्या वाघिवणे गावाला मदत करूया असा सल्ला दिला, त्या गावात जाण्याचा रस्ता सुद्धा वादळाने वाहून गेला होता पण गावातील लोकांनी गावाचा संपर्क रहावा यासाठी रस्त्यावर खडी टाकून रस्ता तयार केला, उद्देश एकच होता की येणारी सरकारी मदत व अधिकारी गावा पर्यंत पोचले पाहिजे कारण गावाचे नुकसान बरंच होत. गावात प्रवेश केला तेव्हा समजलं की या लोकांनी निसर्ग वादळाचा सामना कसा केला असेल, आम्ही गावात आल्याचं समजलं तेव्हा एक एक गावकरी जमू लागले व प्रत्येकजण आपली व्यथा सांगण्याचा प्रयत्न करत होते कारण त्यांच बोलणं ऐकून घ्यायला कोणी आले असं त्यांना वाटत होत. प्रत्येकजण आम्हाला त्याच घर झालेलं नुकसान पाहण्यासाठी बोलावत होते, पण त्यांच नुकसान पाहून वाटत होत की आम्ही आणलेली मदत या नुकसाने पुढे काहीच नव्हती…
पण आम्हाला एक समाधान होत की झालेल्या नुकसानीमध्ये आमचा टिळक आळी मित्र मंडळाचा छोटा का होईना पण मदतीचा एक खारीचा वाटा होता. सर्वांचा निरोप घेऊन व परत काहीतरी मदत मिळवून देऊ असे आश्वासन देऊन आम्ही परत रत्नागिरी साठी मार्गस्थ झालो.
आज आम्हाला समजलं होत की निसर्ग आपल्याला भरभरून मुक्त हस्त देत असतोच पण निसर्गाचा अवमान केल्यास त्याचा परिणाम कुठे ना कुठे भोगावा लागतोच.
सदर मदत वाटप कार्यासाठी
सचिन करमरकर,प्रवीण हेळेकर, राहूल काळे, योगेश करमरकर, उन्मेष नितोरे, संकेत बापट, निखिल आंबर्डेकर, अजिंक्य मुळे, आदित्य जोशी उपस्थित होते. त्याचप्रमाणे या मदत कार्यासाठी आमच्या इतर मित्रांनीही भरघोस आर्थिक मदत केली.