दापोली शिवसेना शहरप्रमुख पदावरील निवड हुकुमशाही पद्धतीने- पप्पू रेळेकर यांचा आरोप,माझी निवड वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे नवे शहरप्रमुख राजेंद्र पेठकर यांचा खुलासा
शिवसेनेच्या दापोली शहरप्रमुख पदावर राजेंद्र पेठकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने तरूण शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून शिवसेनेचेच माजी शहरप्रमुख पप्पू रेळेकर यानी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या नाराजीला तोंड फोडले असून रेळेकर यांच्या भूमिकेला शिवसैनिकांकडून पाठिंबा मिळत आहे.
ही निवड करताना विद्यमान शहरप्रमुख व सध्या वैद्यकीय उपचार घेत असलेले शहरप्रमुख सुहास खानविलकर यांनाही विश्वासात न घेता ही नियुक्ती केली आहे. वरिष्ठांनी हा घेतलेला निर्णय कोणत्याही सामान्य शिवसैनिकांना पटलेला नाही म्हणून असे कोणतेही निर्णय सामान्य शिवसैनिक स्विकारणार नाहीत. याचाच एक भाग म्हणून काही प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिकांनी दापोली शिवसेना शहर शाखेत न जाण्याचा निर्णय घेतला असून पक्षाने या नियुक्तीचा पुनर्विचार करावा व ही नियुक्ती रद्द करून गेली अनेक वर्षे असलेल्या परंपरेला अनुसरून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पप्पू रेळेकर यांनी केली आहे.
माझी दापोली शहरप्रमुखपदी झालेली निवड ही वरिष्ठांच्या आदेशानुसार झाली असून शिवसेनेमध्ये आदेशच चालतात असे मत नवनिर्वाचित शहरप्रमुख राजेंद्र पेठकर यांनी मांडले.
शिवसेनेतील अंतर्गत वादाबाबत श्री. पेठकर यांची भूमिका जाणून घेतली असता श्री. पेठकर म्हणाले की, वाद हे नेहमीच माझ्या बाबतीत निर्माण होतात. मात्र त्यावर मात करून मला नेहमी पुढे जाणे आवडते. मी एक निष्ठावान शिवसैनिक असून पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.
www.konkantoday.com