राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प उभारावा कोकण जनकल्याण प्रतिष्ठानची मागणी

रिफायनरी उद्योगाला शिवसेनेचा विरोध नाही व जिथे जमीन मालक जागा देतील तेथे प्रकल्पाचे स्वागत केले जाईल, अशी भूमिका आहे अशा स्थितीत रिफायनरी प्रकल्प उभारणी ला राजापूर तालुक्यातील जमीनमालक जागा देण्यास तयार आहेत. त्याची संमतीपत्रेही आमच्याकडे आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीतून लाखो लोकांना रोजगार देणार्‍या रिफायनरी प्रकल्पाबाबत कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासाच्यादृष्टीने सकारात्मक विचार करून तो राजापूर तालुक्यातच तो उभारावा, अशा मागणीचे निवेदन कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.मॅग्नेटिक महाराष्ट्र-2 या उपक्रमांतर्गत सुमारे 16 हजार कोटींचे बारा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाने केले आहेत. त्यातूनच परदेशी गुंतवणूक देशात आणून देशासह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यावर भाष्य करताना कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आंबेरकर यांनी राज्यासह कोकणच्या अर्थव्यवस्थेला विकासाला ऊर्जितावस्था देणार्‍या रिफायन प्रकल्पाचे महत्व निवेदनाद्वारे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे विषद केले आहे.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असलेल्या रिफायनरीमुळे येथील बाजारपेठेला ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे. त्यातच, इतर पूरक उद्योग व्यवसाय, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलीटी, वाहतूक इत्यादी क्षेत्र प्रचंड प्रमाणात विस्तारेल. वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्र व सुविधांमध्ये आमूलाग्र बदल होतील. रिफायनरीच्या अवतीभोवती निर्माण होणार्‍या विस्तारित क्षेत्रांमध्ये पेट्रोकेमिकल पार्क व तत्सम इतर उद्योग, बंदरामुळे येणार्‍या सुविधा, वैद्यकीय व्यवस्था, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था, पर्यटन व्यवस्था यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकर्‍या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केले आहे. कोरोनाच्या संकटामध्ये उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असून अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आली आहे. त्यातच, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे अडीच लाख लोक कोरोना काळामध्ये स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांनाच रिफायनरी प्रकल्प उभारणीचा फायदा होणार आहे. त्यातच, स्थानिकांसह कराच्या माध्यमातून राज्यासह देशाच्या गंगाजळीमध्येही भर पडणार आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या सकारात्मक बाबींचा विचार करून हा प्रकल्प राजापूर तालुक्यामध्ये उभारणीचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आंबेरकर यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button