परशुराम ते खेरशेत महामार्गाच्या कामाचा ठेकेदार न बदलल्यास मोठे आंदोलन उभारावे लागेल – आ. भास्कर जाधव
चिपळूण तालुक्यात परशुराम ते खेरशेत दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम कुर्मगतीने सुरू आहे. गेल्या चार वर्षाच्या कालावधीत केवळ ६ टक्के काम मार्गी लागले. त्यामुळे या ठेकेदाराकडून पुढील पाच काय दहा वर्षात महामार्गाचे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे येथील ठेकेदार बदलल्याशिवाय पर्याय नाही. हा बदल न झाल्यास दिवाळीत मोठे आंदोलन उभारावे लागेल असा इशारा आमदार भास्करराव जाधव यांनी आढावा बैठकीत दिला.
डिसेंबर २०१४ पासून महामार्ग होत असल्याचे अनेकांनी सांगितले असले तरी चिपळूणच्या बाबतीत विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधीत ठेकेदार काम करण्याच्या मानसिकतेत नाही. महामार्ग विभागाचे अधिकारीही या विषयी सहमत आहेत. गेल्या चार वर्षाचा विचार करता अवघे सव्वा सहा टक्केच काम झाले आहे. उर्वरित काम कधी होईल याची शाश्वती नाही. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत हा ठेकेदार बदलणे आवश्यक असून दिल्लीतील एका समितीमार्फत नुकतीच या कामाची पाहणी करण्यात आली. त्यांच्याकडे नवीन ठेकेदार देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही आ. जाधव यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com