महावितरणमध्ये कंत्राटी कामगार आंदोलनाच्या तयारीत
विज वितरणातील कंत्राटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नासाठी राज्य वीज कंत्राटी कामगार संघ कालपासून ७ जुलैपर्यंत चार टप्प्यात बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आनंद लाड यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जग घेरले असून वीज वितरणाच्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपनीत हजारो कंत्राटी कामगार जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. तसेच निसर्ग वादळात पाऊस वार्याची पर्वा न करता जनतेला अहोरात्र अखंडीत वीजपुरवठा देण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. लॉकडावूनच्या काळात काम करीत असताना राज्यात ८ कंत्राटी कामगार मृत पावले तर १२ कामगार जखमी झाले होते. कंत्राटी कामगारांना राज्यात अनेक ठिकाणी कधीच वेळेवर वेतन दिले जात नाही. तसेच वेतनातील फरक व दिवाळीचा बोनसही दिला जात नाही. सॅनिटायझरसाठी मंजूर केलेले १००० रुपये सुद्धा अनेकांना मिळालेले नाहीत. उलट कामगारांकडूनच कंत्राटदार पगारातून हजारो रुपये अनधिकृतरित्या काढून घेत असून त्याविरूद्ध तक्रार करणार्या कामगारांना कमी केले जात आहे. याशिवाय या कामगारांना कुठल्याही विमाचे संरक्षण नाही. त्यामुळे आता हे कर्मचारी आता आंदोलनासाठी उतरले आहेत. काल हे कामगारानि काळ्या फिती लावून काम केले. पुढील टप्प्यात आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com