
चतुरंगतर्फे रंगणार संगीतकार अशोक पत्कींशी सांगीतिक गप्पा !
१६ मे ला देवरुखात तर १७ मे ला रत्नागिरीत कार्यक्रम
‘चतुरंग’च्या ‘मुक्तसंध्या’ उपक्रमातून अनेक कलाकारांशी, मान्यवर नामवंतांशी आमने सामने सहवास-संवाद साधण्याची संधी रसिकांना बरेच वेळा मिळत असते. किंबहुना हे असे घडवून आणणे हाच चतुरंगचा उद्देश असतो ! त्यानुसार येणाऱ्या मुक्तसंध्येत चतुरंग आपल्या भेटीला घेऊन येत आहे, जुने-जाणते, जेष्ठ आणि ख्यातकीर्त संगीतकार श्री.अशोक पत्की यांना !!
जवळपास ५० वर्षांच्या कारकीर्दीत शेकडो चित्रपट – नाटकांना संगीत दिलेल्या, शेकडो जिंगल्स लोकप्रिय केलेल्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी अनेक मालिकांची शीर्षकगीते संगीतबद्ध केलेल्या संगीतसम्राट अशोजींना साक्षात अनुभवण्याची, जाणून घेण्याची संधी देवरुख आणि रत्नागिरीवासियांना मिळणार आहे…..
अशोकजींच्या संगीत साधनेतील वेगळेपणाची ओळख सांगणारा, अनेक बहुरंगी-बहुढंगी अनुभवांनी सजलेला आणि स्वररचनांमागील औत्सुक्याचा, वेगळेपणाचा सहस्त्रचंद्रदर्शनी प्रवास आपल्याला ह्या सांगीतिक गप्पांमधून अनुभवता, जाणून घेता येणार आहे. अशोकजींशी सुसंवाद साधत त्यांना बोलतं करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत चिपळूण येथील प्रसन्नवदनी अभ्यासू निवेदिका, सूत्रसंचालिका, संवादिका सौ. मीरा पोतदार !!!
‘अभिरुची’ संस्थेच्या सहकार्याने देवरुख येथे होणारा कार्यक्रम सोमवार, दि. १६ मे रोजी सायंकाळी ०६:३० वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय येथे, तर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने होणारा रत्नागिरी येथील कार्यक्रम मंगळवार, दि. १७ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजता वाचनालयाच्याच सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. देवरुख, रत्नागिरी आणि परिसरातील रसिकांनी आपापल्या सोयीच्या ठिकाणी आपल्या संगीतप्रेमी रसिक मित्रमंडळींसह उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचं आवाहन चतुरंग प्रतिष्ठान परिवार, अभिरुची संस्था आणि रत्नागिरी नगर वाचनालय यांनी आपल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे समस्त कोकणरसिकांना केले आहे.