विजेच्या वाहिनीचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू
दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना दि. १० रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. गिम्हवणे-उगवतवाडी येथील जयवंत जानू येसवारे हे बुधवारी सुहास रायकर यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. सायंकाळी काम संपल्यावर लघुशंकेसाठी ते शेताच्या बांधावर गेले असता, शेतातील विजेच्या पंपाच्या वायरमधून विजेचा धक्का जयवंत येसवारे यांना बसला. जयवंत परत आले नाहीत, हे पाहून त्यांच्यासोबत असलेले शांताराम भुवड त्यांना पहावयास गेले. त्यावेळी जयवंत तेथे पडलेले दिसले. येसवारे यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत पावले असल्याचे सांगितले. या घटनेची नोंद दापोली पोलिस ठाण्यात झाली आहे.
www.konkantoday.com