
मान्सूनचे दमदार आगमन जिल्ह्यामध्ये सर्वदूर वृष्टी
रत्नागिरी दि.12:- एक दिवसाच्या विलंबाने परंतु दमदार आगमन करणाऱ्या मान्सूनमुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाला सुरुवात. सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 203 मिलीमीटर पाऊस झाला याची सरासरी 22.56 मिमी आहे.
काल गुरुवारी दुपारनंतर मान्सून दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पावसाला सुरुवात झाल्यापासून तो ठराविक काळाने सरीवर सरी होवून कोसळत आहे.
गेल्या 24 तासात सर्वाधिक 66 मिमी पाऊस राजापूर तालुक्यात झाला तर लांजा तालुक्यात 40 मिमी आणि रत्नागिरीत 34 मिमी पावसाची नोंद झाली.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेला दापोली तालुक्यात 21 मिमी पावसाची नोंद झाली मात्र मंडणगड तालुक्यात पाऊस पडलेला नाही.
गुहागर,खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी 10 मिमी तर संगमेश्वर तालुक्यात 12 मिमी पावसाची नोंद झाली.
या पावसाळ्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात 289.44 सरासरीने 2605 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.