राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निसर्ग वादळात फटका बसलेल्या दापोली- मंडणगड परिसराला भेट
निसर्ग वादळाचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्याला मोठा फटका बसला असून दापोलीतील काही गावांची वाताहात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल रायगड जिल्ह्याला भेट दिल्यानंतर आज त्यांनी सकाळी मंडणगड तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणार्या वेळास, बाणकोट, वेसवी व अन्य गावांना भेटी देवून चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गावांची पाहणी केली. मंडणगड तालुक्यातील २५ पेक्षा जास्त गावे उदध्वस्त झाली आहेत. तर १०९ गावांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याशिवाय आंबा, सुपारी, काजू व मसाल्याच्या बागाही उदध्वस्त झाल्या आहेत. याशिवाय घरांचीही पडझड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. लोकांचे अन्नधान्य, गुरांचे वैरण भिजून नुकसान झाले आहे. पवार यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांची भेट घेवून त्यांना धीर दिला. कोणत्याही परिस्थितीत कोकणातील नुकसानग्रस्त माणूस अथवा कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असेही त्यांनी नुकसानग्रस्तांना आश्वासन दिले. यावेळी त्यांचेसोबत रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आ. शेखर निकम, आ. योगेश कदम व माजी आमदार संजय कदम आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com