
ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्तीचा निर्णय लालफितीत अडकला
जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका न घेता प्रशासक नियुक्तीचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केला आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्थानिकांकडे प्रशासकाची जबाबदारी सोपवावी असे ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. जुन्या निर्णयानुसार ग्रामपंचायतींवर यापूर्वी अधिकार्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात होती. नवीन निर्णयानुसार स्थानिक व्यक्तींकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपवायची असून ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले आहे.
राज्यपालांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात जनतेमधून प्रशासक नेमावा असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सदरचे परिपत्रक अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याचे कारण पुढे करून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने प्रशासक नियुक्तीचा निर्णय जाणीवपूर्वक लालफितीत अडकून ठेवला आहे.
konkantoday.com