स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी जंगलात पाळत ठेवून मुसक्या आवळल्या


स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी जंगलात पाळत ठेवून मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे
वासनांध दत्तात्रय गाडे, स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. आज पहाटे अखेर तो सापडला. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले.शिरूर तालुक्यातील कनाट गावातील उसाच्या चारीत तो लपला होता. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले.

मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही बलात्काराची घटना घडली होती. कौन्सिलर असलेली २६ वर्षीय तरुणी लोणंद या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्थानकावर आली होती. ही तरुणी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली. गोड बोलून ओळख वाढवली आणि स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तिला घेऊन गेला आणि ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र आता आपण पकडले जाणार हे लक्षात आल्यानंतर आरोपी दत्ता गाडे फरार झाला होता.

इकडे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. त्याच्या घरी जाऊन पाहिले, मित्रांकडे चौकशी केली. पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानक सर्व परिसराची झाडाझडती घेतली. मात्र त्याचा ठाव ठिकाणा काही लागला नाही. अखेर शेवटी तो सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केले होते. मात्र त्याचा तपास कुठेही लागत नव्हता. इकडे पोलिसांवर टीकेची झोड उडाली होती. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले होते. दुसरीकडे पोलीस पूर्ण ताकदीने त्याचा शोध घेत होते. तपासादरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे त्याचं मूळ गाव असलेल गुनाट या गावात आढळले होते. बुधवारी रात्री तो शेवटचा याच गावात दिसल्याचं ग्रामस्थांनीही सांगितले. आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या गावाभोवती आपले लक्ष केंद्रित केले.गुरुवारी दुपारीच १५० ते २०० पोलीस या गनाट गावात दाखल झाले आणि त्यानंतर सुरू झाली सर्च मोहीम. गनाट गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या ठिकाणी दत्ता गाडेचा शोध सुरू झाला. या गावाच्या आजूबाजूला उसाची शेती आहे. आरोपी या उसाच्या शेतात लपला असावा अशी शक्यता गृहीत धरून शोध सुरू झाला. उसाच्या शेतात जाऊन, खबरदारी बाळगत पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. जमिनीवरून पोलीस तर आकाशातून ड्रोन या नराधमाचा शोध घेत होते. मात्र हाती काहीच लागत नव्हतं. जसा जसा अंधार पडू लागला तसा तसा पोलिसांच्या चिंतेत मात्र वाढ झाली. शिरूर तालुक्यातील हे गाव बिबट्याच वावर असलेलं क्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे बिबट्याची भीती वेगळीच होती. शेवटी कुठलाही धोका नको म्हणून सायंकाळी सात नंतर अंधार पडतात पोलिसांच्या शोध मोहिमेला काहीसा ब्रेक लागला आणि आरोपी सापडण्याची शक्यता आणखी धूसर झाली..मात्र असं असलं तरीही पोलिसांनी अजूनही आशा सोडली नव्हती. स्वारगेट तपास पथकातील कर्मचारी अलर्ट मोडवर होते आणि अखेर त्यांना यश मिळालं. शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास एका शेतातील चारीत या कर्मचाऱ्यांना काही संशयास्पद हालचाल जाणवली आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी धाडसीपणा दाखवत झडप घालून त्या व्यक्तीला पकडले. सोबत असलेल्या ग्रामस्थांकडून हाच दत्ता गाडे असल्याची ओळख पटवली. पोलिसांनी क्षणाचाही वेळ न दवडता त्याला गाडीत बसवून ही गाडी पुण्याच्या दिशेला दामटली. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीला घेऊन ही पोलीस कर्मचारी लष्कर पोलीस ठाण्यात पोहोचले.

सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button