आज पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नाभिक बंधूचे “हत्यारबंद आंदोलन”, कोणाच्याही घरी जाऊन कोणत्याही नेत्याची, पुढार्‍याची, अधिकाऱ्याची केस दाढी न करण्याचा इशारा

लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन सलून उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम सलून चालक, मालक, कारागीर यांनी शासनास सहकार्य करून आपली दुकाने बंद ठेवली पण शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले व सलून दुकाने उघडण्यास आजही परवानगी नाकारली आहे. उदरनिर्वाहसाठी पारंपारिक नाभिक व्यवसायाशिवाय इतर साधन नाही. ९०% लोकांकडे शेती नाही, दुकानेही भाडे पट्ट्याने घेतली आहेत त्यामुळे भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उदार उसनवारी आदी खर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि उपासमारीच्या पार्श्‍वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी आज चिपळूणमध्ये तातडीच्या जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष महादेवराव चव्हाण, रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण ऊर्फ बावा चव्हाण, तसेंच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित हाेते आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तथा बावा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांची एक आंदोलन समिती गठीत करण्यात आली. या समितीला सर्वाधिकार देण्यात आले.
शासनाने सलून दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, नाभिक समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५०००/- रुपये जमा करावेत , सलून व्यावसायिकाला ५० लाखांचे विमा संरक्षण तसेंच सुरक्षितता किट आदी शासनाने ताबडतोब देऊन नाभिक समाजाला या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी करण्यात आली. “शासन आपल्याला गृहीत धरू पाहत आहे. आपल्या समाजावरील हे संकट घालविण्यासाठी आणि आपला हक्क मिळवण्यासाठी आता स्वस्थ बसून चालणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून नाभिक बांधव आंदोलन करीत आहे. आपल्या आवाज शासनापर्यंत पोहचवण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही” असे कार्याध्यक्ष महादेवराव चव्हाण यांनी म्हटले. तर “आज जवळ जवळ इतर सर्वच दुकाने चालू झाली असून अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते आणि नाभिक बांधव सर्व प्रकारची खबरदारी आणि दक्षता घेत असूनही सलून बंदीचा आदेश काढण्यात येतो हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे” श्रीकृष्ण चव्हाण यांनी सांगून आज पासून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नाभिक बंधू “हत्यारबंद आंदोलन” करीत आहोत, यापुढे कोणीही कोणाच्याही घरी जाऊन कोणत्याही नेत्याची, पुढार्‍याची, अधिकाऱ्याची केस दाढी करणार नाही. कोणत्याही विधीकार्याला नाभिक बांधव काम करणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे चालू राहील असे जाहीर केले. याबरोबरच या बैठकीत ठरल्यानुसार मंगळवार दिनांक ९ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक याबरोबरच तेथील स्थानिक आमदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येतील. याउपरही सलून चालू करण्यास परवानगी न मिळाल्यास “लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलने” करण्यात येईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button