
तुंबाड येथे जगबुडी नदीत पोहायला गेलेले पाच जण बुडाल्याची घटना तिघांना वाचविण्यात यश, दोन तरुणांचा अंत
* खेड तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पोहायला गेलेले पाच जण बुडाल्याची घटना सोमवार, २० मे रोजी घडली. यातील तिघांना वाचविण्यात यश आले असून, दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सौरभ हरिश्चंद्र नाचरे पन्हाळजे, ता. खेड ) व अंकेश संतोष भागणे (२०, रा. मधली वाडी, बहिरवली, ता. खेड) अशी या मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सौरभ आणि अंकेश यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड येथील जगबुडी नदीपात्रात पोहायला गेले होते. नेमकी ती वेळ भरतीची असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जण गटांगळ्या खाऊ लागले.तेथे एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने ही घटना बघितली आणि त्यातील तिघांना वाचवले. परंतु सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले.