
वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करा- ऊर्जामंत्री डॉ. राऊत
निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यात अभूतपूर्व नुकसान झाले असून वीज वितरण यंत्रणेची देखील अतोनात हानी झाली आहे. वादळामुळे उध्दवस्थ झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धस्तरावर काम करा, जिल्ह्याबाहेरील नुकसान न झालेल्या भागातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार, कामगारांची मदत घ्या, असे निर्देश ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
बुधवारी झालेल्या निसर्ग चक्री वादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी तातडीने गुरुवारी (०४ जून) दिवसभर व रात्री उशिरापर्यंत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आवश्यक सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या दौऱ्यात त्यांनी वरखड, कोलाड, इंदापूर, माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन येथील नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत म्हणाले, महावितरणकडून सतर्कता बाळगल्याने व पूर्वसूचना देऊन वीजपुरवठा बंद ठेवल्याने जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात रोखता आली.
वीज पुरवठा सुरळीत करतांना प्राधान्यक्रम ठरवून सुरुवातीला रुग्णालये, पाणीपुरवठा योजना, संचार माध्यमे यांचा वीजपुरवठा त्वरित सुरु करावा. वीज वितरण यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी नवीन वीजखांब, रोहित्र, वीज वाहिन्या व अनुषंगिक साहित्यांसह अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. यासाठी भांडुप, नेरूळ यांसह शेजारच्या विभागांमधून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. वीजयंत्रणा पूर्ववत करण्याचे हे मोठे आव्हान आहे, त्यामुळे अभियंते व कर्मचाऱ्यांचे मनोधेर्य खचणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन दक्षता बाळगून सर्वांनी एकजुटीने काम केल्यास जलदगतीने कामे पूर्ण होतील. या कामी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या भागात जागोजागी मोठमोठे वृक्ष कोसळल्याने व वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्याने अनेक ठिकणी रस्ते बंद आहेत. तसेच उच्च व लघुदाबांच्या वीजवाहिन्या व खांब जमीनदोस्त झाले आहेत. हे वृक्ष हटवून वीज वितरण यंत्रणा पूर्ववत करण्याचे आव्हान देखील आहे. हे आव्हान स्वीकारून महावितरणने कामाला गती दिली असून नागरिकांनी प्राप्त परिस्थिती लक्षात घेत संयम बाळगून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी केले. या पाहणी दौऱ्यात रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव (ऊर्जा) तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. गोविंद बोडके, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, रोहा प्रांत अधिकारी दिघावकर, श्रीवर्धनचे प्रांत अधिकारी श्री.अमित शेडगे प्रामुख्याने उपस्थित होते.
www.konkantoday.com