
वाटूळमध्ये ग्रामीण मराठी साहित्य संमेलन.
राजापूर, लांजा तालुका नागरिक संघ आणि वाटूळ ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वाटूळ येथे पुढील महिन्यात दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या साहीत्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला (ता. ३१) वाटूळ गावाच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीचे पूजन होणार आहे. या नदीपूजनाच्या अनोख्या कार्यक्रमासाठी संत तुकाराम महाराजांचे बारावे वंशज अमोल बुवा मोरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.संत तुकाराम महाराजांचे बारावे वंशज अमोल बुवा मोरे यांची राजापूर, लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी नुकतीच देहू येथे जाऊन भेट घेतली.
या वेळी अमोल बुवा मोरे यांच्याशी संवाद साधून या साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याचा आग्रह केला. त्यांनी ही विनंती मान्य करून साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आश्वासन श्री. लाड यांनी दिली. ग्रामीण भागातील साहित्यीकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राजापूर-लांजा नागरीक संघातर्फे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जात आहे. तालुक्यातील वाटूळ येथे दहावे साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. १ आणि २ फेब्रुवारी या कालावधीत हे साहित्य संमेलन होणार आहे.