रत्नागिरी शहरात मोकाट गुरांचा वाढता त्रास; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडून त्वरीत उपाययोजना अपेक्षित – युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत

रत्नागिरी, दि. २८ ऑक्टोबर :
रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून ते निवासी भागांपर्यंत, तसेच बाजारपेठा आणि शाळांच्या परिसरातही गुरांचा संचार वाढल्याने नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. रस्त्याच्या मधोमध गुरे बसल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून अनेक वेळा अपघातांची उदाहरणे समोर आली आहेत. यावर त्वरीत उपाय योजना करा अन्यथा पुढील परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवा असा ईशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे.
शहरातील जयस्तंभ चौक, टिळक स्मारक परिसर, बसस्थानक परिसर, तसेच महामार्गावर आणि मिरजोळे औद्योगिक क्षेत्राजवळ मोकाट जनावरांचे प्रमाण विशेषतः वाढले आहे. नागरिकांनी अनेकदा नगरपालिका आणि ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या असल्या, तरी ठोस कारवाईचा अभाव असल्याची नाराजी प्रसाद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
नगरपरिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून काही वेळा जनावरांना पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले असले तरी, आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधांच्या अभावामुळे हे प्रयत्न अल्पकालीन ठरतात. पकडलेली जनावरे काही दिवसांत पुन्हा रस्त्यावर दिसू लागतात. अनेक पशुपालक आपल्या गुरांना सकाळी सोडून देतात आणि संध्याकाळी परत नेतात तर काही जण नेतही नाहीत अशीही तक्रार स्थानिकांकडून केली जाते.
यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे, शाळकरी मुलांची सुरक्षितता आणि दुचाकीस्वारांचे होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. काही वेळा रुग्णवाहिकांनाही या गुरांच्या गर्दीचा त्रास होत आहे, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे, असेही प्रसाद सावंत यांनी निदर्शनास आणून दिले.
या पार्श्वभूमीवर प्रसाद सावंत यांनी नगरपालिकेकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. गुरांना ठेवण्यासाठी स्वतंत्र शेड उभारणे, जनावरांचे मालक शोधून दंडात्मक कारवाई करणे आणि जनजागृती मोहिमा राबविणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मोकाट गुरांचा प्रश्न फक्त वाहतुकीपुरता मर्यादित नसून स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर ठरत आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या गावमध्येही प्रशासनाकडून तातडीने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त त्यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर लवकरच नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि संबधित ग्रामपंचायत यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button