आम्ही हे अनुभवलय… वादळ-वाट-१९६६
दिवस १:- ११ नोव्हेंबर १९६६
नोव्हेंबर १९६६ मधील गोष्ट. ९ वीत होतो. एन सी सी च्या कॅंपला वारणानगरला गेलो होतो. शनिवारी ११ नोव्हेंबरला सायंकाळी कॅंपची समाप्ती झाली. १०-१२ दिवसांच्या कठोर परिश्रमांच्या कॅंप आटपल्यामुळे आणि आता शिस्त थोडीशी ढील झाल्यामुळे दिवाळीत रत्नागिरीला परतायचे आणि मग पुढे दिवाळीच्या सुट्टीची मज्जाच मज्जा. अशा आनंदात रात्री तंबूत निद्रिस्त झालो. पहाटे बरोबर ६ वाजता बसेस येणार आणि कोल्हापूर स्टॅंडला सोडणार आणि तेथून सकाळी ८ ची रत्नागिरी गाडी पकडून घरी असा नियोजित कार्यक्रम ठरलेलाच होता. रात्री बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली होती, पण जोर नव्हता आणि वारणानगरच्या बाहेर काय चाललाय याची पुसटशी सुध्दा कल्पना नव्हती.
दिवस-२:- १२ नोव्हेंबर १९६६….
पहाटे ४ च्या दरम्याने दमून भागून झोपल्या आम्हा कॅडेट ना जाग आली ती तंबूत शिरलेल्या पाण्यामुळेच. धावपळ सुरु झाली. कसे बसे ट्रंकेत सामान भरून बसेस येणार त्याठिकाणी पळतच वारणा कॉलेजच्या आश्रयाला गेलो. ६ वाजता आलेल्या बसमध्ये बसलो आणि कोल्हापूर स्टॅंडला तासाभरातच उतरलो. पावसाने साथ सोडलेली नव्हतीच. आमचेपैकी मित्रवर्य बाबा परूळेकर आणि काही कॅडेट कोल्हापूरला थांबणार असल्याने ती मित्रमंडळी तेथूनच अन्यत्र रवाना झाली.
लगेच गाडी लागणार या आनंदात कॅंटीनकडे पाठ फिरवून आम्ही १०-१५ कॅडेटस प्लॅटफॉर्मवर रत्नागिरी बसची वाट पहात बसलो. ८ वाजून गेले, ९ वाजले, वेळ वाढत गेली तशी अस्वस्थता वाढतच गेली. शेवटी बस रद्दच करण्यात आल्याचे जाहीर झाले, पण त्याचवेळी सर्वांना ११ वाजतांच्या कोल्हापूर-रत्नागिरी टपाल गाडीने नक्की पाठविण्यात येईल असेही जाहीर झाले. आता मात्र एस टी कॅंटीनला भेट देण्याशिवाय पर्यायच नव्हता कारण एव्हांना पोट रडायला लागले होते. स्टॅडवर चर्चा होती सगळीकडे हा अकाली पाऊस जोरात पडणार आहे, पडतोय. पण आम्ही घरी पोचण्याच्या मूडमध्ये ना. त्याही गाडीला खूप उशीर होत होता, पण शेवटी ११ ची गाडी १ च्या दरम्याने सुटली एकदाची. आता टपाल गाडी म्हणजे सगळे स्टॉप कंपलसरी हे ओघानेच आले. आधी साधारणपणे अर्धा-पाऊणतास गाडी सुटल्यावर कोल्हापूर रेलवे स्टेशनला आर एम एस चे टपाल घेण्यासाठी थांबलीच. टपालाच्या पिशव्या गाडीत पडल्यानंतर अखेरीस दरमजल करीत रत्नागिरीकडे गाडी निघाली. पाऊस काही थांबत नव्हताच. त्यातच टपालगाडी असल्याने एस टी ची सर्वात नावडती आणि त्यामानाने गाडीची देखभाल दुरुस्ती! ड्रायव्हर अधून मधून हातानेच वायपर हलवत होता आणि गाडी चालवत होता. मलकापूरला येईपर्यंत थकला बिचारा आणि मग तेथे अर्धा तासभर गाडी चहाला थांबली. कोकणातून काही गाड्या आल्या होत्या त्यांचेकडून पाऊस तुरळक पडतोय अशी माहिती घेऊन आमची पुढची वाटचाल सुरु झाली. एकंदरीत सर्व गोष्टी विलंबानेच घडत होत्या. कधी कधी पुढे घडणाऱ्या अघटित घटनांची नांदी अशीच होत असते कदाचित……
एस टी ने कळकदरी ओलांडली. बारीक पाऊस चालूच होता. खिडक्या बंद होत्या. इतक्यात आमच्या समोर एका गाडीवर झाड पडल्याचे दिसल्याने एस टी थांबली. आम्ही एन सी सी कॅडेट त्यामुळे तात्काळ मदतीसाठी बाहेर पडणे हे ओघानेच आले. खाली उतरलो तर काय कधीही अनुभवलेला नाही एवढा सोसाट्याचा वारा. अतिशयोक्ती नव्हे, खरोखरच बस जोरात हलत होती. थांबलेल्या गाडीतील एक व्यक्ति ओळखीची वाटली म्हणून पुढे होऊन पाहिले एक किरकोळ व्यक्ति धोतर, शर्ट आणि काली टोपी, अरे हे तर पेंटर गोगटे. गाडीच्या बॉनेटवर झाडाची फांदी पडल्याने काच फुटली होती. गाडीतील व्यक्तिही परिचयाची होती, ते गोगटे कॉलेजमधील प्रोफेसर मेनन होते. कोल्हापूरला निघाले होते. आम्ही एस टी ड्रायव्हरच्या मदतीने आणि त्याचेकडील स्टेपणी उतरवायच्या शेड्याच्या दोऱ्याने फांदी दूर केली. (त्यानंतर मी नेहमी स्टेपणी टपावरून खाली टाकून देण्याचीच प्रथा पाहिली !) पेंटर म्हणाले गाडी चालू आहे मी सावकाश सावकाश कोल्हापूर पर्यंत नेईन तूम्ही काळजी करू नका. गाडीची ड्रायव्हर समोरची पूर्ण काच उठलेले असताना सुद्धा त्यांनी गाडी पुढे नेण्याचे ठरवले. आम्ही त्यांना बाय बाय केले आणि दरमजल करीत घाट उतरून साखरपा येथे पोहोचलो. तेथे तर तुफान पाऊस होता. जुना स्टॅंड, शेड नाही, नाना शेट्ये यांचे एकमेव हॉटेल, त्यात काही शिल्लक माल नाही, कसा बसा त्यांनी चहा करून दिला का ते माहित नाही पण पैसे मात्र घेतले नाहीत एवढं आठवतं. तेथेही रत्नागिरीहून आलेली एक गाडी भेटल्याचे आठवते. पण अति पाऊस एवढाच काय तो विषय.केव्हा एकदा रत्नागिरी येतेय असे झाले होते. पण घडले काही विपरितच.
दाभोळे घाट चढून वर आलो. देवळे सोडले आणि भर रस्त्यात एक झाड तिरके पडलेले, गाडी थांबली. ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी साधारण मुआवजा घेतला आणि आम्हाला आवाज दिला. थोडे दोऱ्याने ओढले तर बाजूला होईल गाडी पुढे काढता येईल. खिडकीतून सर्वांनी अंदाज घेतला आजूबाजूची झाडे वाऱ्याने जोरात हलत होती पण त्यातले गांभीर्य आम्ही खाली उतरल्यानंतरच कळले. नुसताच सोसाट्याचा वारा नव्हता तर तो वादळी वारा होता आणि वाऱ्याचा वेग आणि त्याचा आवाज आणि वीजेच्या कडकडाटाबरोबर येणारा पाऊस अक्षरश: उरात धडकी भरविणारा होता. एकमेकांना धीर देत आम्ही खाली उतरलो, झाड बाजूला ओढले आणि गाडी पुढे काढली. गाडीत २-४न कुटुंबे भाऊबीजेला रत्नागिरीला निघालेली होती. त्यांच्याबरोबर लहान मुलेही होती. त्याकाळी लहान मुलांसाठी प्रवासात खाण्यापिण्याच्या वस्तु सोबत घेत असत त्यामुळे त्यांना काळजी नव्हती. पण त्यांनी आमची काळजी केली, बाहेर उतरतांनाही काळजी व्यक्त केली. पण आम्हालाही पर्यायच नव्हता. त्यानंतर साधारणपणे नाणीजच्या पुढे येईपर्यंत आम्ही भर वाऱ्यात आणि पावसात भिजून ७ते ८ झाडे बाजूला करीत बहुधा खानूच्या आसपास म्हणजे पालीच्या अलिकडे ३ मैलावर आलो. साधारण काळोख झालाच होता. काही झाडे बाजूला करण्याचे काम तर आम्हाला एस टी च्या हेडलाईटस मध्येच करावे लागले. मात्र नंतरचे दृश्य पाहून आम्ही सर्वजण हतबलच झालो. त्या काळातील लोकांना आठवत असेल या मार्गावर दुतर्फा अनेक मोठ-मोठी झाडे होती. एक डावीकडून तर त्याच्या पुढचे उजवीकडून अशी झाडे पडून रस्ता संपूर्णपणे ब्लॉक झाला होता. आता आम्ही काहीही करूच शकत नव्हतो. धाडसाने उतरून थोडावेळ पहाणी केलीही. पण त्यावेळची दृश्ये पाहून हबकूनच गेलो. झाडे अक्षरश: पिळवटली जात होती. आमच्या देखत बाजूच्या बागेतील माडाचे शेंडे गोल गोल फिरून रस्त्यावर येऊन पडले. मात्र उरलेले माडाचे झाड जाग्यावरच राहिल्याचे दिसून येत होते. (चक्री वादळाचा अर्थ नंतर कळला तेव्हा समज पटली) मग मात्र ड्रायव्हर-कंडक्टरनी सावधपणाचा निर्णय घेऊन आम्हाला गाडीतच बसणे भाग पडले.
बहुधा तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले असावेत. एकतर अंगावर कधीही वाळू न शकणारा एन सी सी चा युनिफॉर्म, कपडे बदलायचे म्हटले तर ट्रंका बसच्या टपावर ताडपत्रीमध्ये बांधलेल्या म्हणजे सगळे सोपस्कार होईपर्यंत आहे नाही ते सगळे पूर्ण भिजून जाणार. भिजल्याने थंडीने गार पडलो होतो. कुडकुडत होतो. गाडीतल्या कुटुंबाने हातावर काही बाही ठेवले आणि मग आम्ही सर्व जण चक्क पोस्टाची एक एक बॅग पांघरून दमलो-भागलो झोपी गेलो. सकाळी ६ वाजता उजाडल्यावर जाग आली आणि तोपर्यंत पाऊसही पूर्ण थांबला होता. आधी टपावरील ताडपत्री काढून ट्रंकेतील त्यातल्या त्यात सुखे कपडे काढून घातले. सकाळी निघताना कॅंपवर दिलेली बॉईल्ड अंडी काही जणांकडे तशीच होती ती वाटून खाल्ली आणि ड्रायव्हर-कंडक्टरना सांगून पुढे गाव दिसते का पाहण्यासाठी वाटोवाट पडलेल्या झाडांवरून उड्या मारत मार्गक्रमणा सुरु केली. एकूण परिस्थिती पहाता रस्ता काही ८-१० दिवस चालू होईल असे वाटत नव्हतेच. पालीमध्ये पोहोचलो. तेथील एका दुकानात पुढील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी शिरलो. मला आठवतं त्याप्रमाणे ते हिरवे नावाचे व्यापारी यांचे दुकान असावे. आम्हाला काही माहिती देण्यापूर्वीच आम्हा सर्वांनाच त्यांनी गरमागरम चहा दिला. रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून झालेल्या चक्रीवादळाविषयी माहिती दिली तेव्हा कुठे आम्हाला काय विपरित घडलय याची कल्पना आली. त्या हिरवे कुटूंबाची एक गोष्ट आजही माझ्या स्मरणात आहे आणि कायम राहील ती म्हणजे आमच्याबरोबरच येईल त्या प्रवासी व्यक्तिला त्यांचेकडून चहा तर दिला जातच होता. संकटात सापडलेल्यांना एका साध्या चहाने किती बरे वाटत असेल याची कल्पनाच करवत नाही, हाच खरा हिरवे कुटुंबाचा “अमृततूल्य चहा”! एव्हढ्यावरच हिरवे थांबले नाहीत. आम्हाला बसवून गरम भात आणि पिठले आग्रहाने खायला लावले. त्यावेळी आमच्यासारखे अनेक प्रवासी त्यांचेकडे पिठले-भात खातांना पाहून आम्ही अवाक झालो. हिरवे कुटुंबाचे ते अन्नछत्र बहुधा सकाळपासूनच चालू असावे. हे त्यांचे औदार्य मी कधीच विसरू शकत नाही. दिवाळी सण आणि भाऊबीजेची ओढ यामुळे आम्ही तेथेच निर्णय घेतला आता चालतच रत्नागिरीला जायचे. हिरवे यांनी आम्हाला आणखी विनंती केली की तुमच्या बरोबरच्या अन्य सर्व प्रवाश्यांनाही येथे घेऊन या त्यांनाही चार घास खाउ देत आणि मग रत्नागिरीकडे जा.
त्यानंतर आम्ही पुन्हा बसकडे येऊन प्रवाश्यांना विनंती केली तुम्ही आमचेबरोबर जुजबी सामान घेऊन चालत येणार असाल तर येऊ शकता. ड्रायव्हर-कंडक्टर येणार नाहीत हे नक्की होते कारण तसेही त्यांना बस सोडून चालणार नव्ह्ते. आमच्या ट्रंकातून चोरण्यासारखे काहीच नव्हते आणि इतर प्रवाशांनीही महत्वाच्या चीज-वस्तू आणि कपडे घेऊन रत्नागिरीला चालत जाण्याच्या आमच्या कल्पनेला पाठींबाच दिला. ड्रायव्हर-कंडक्टरनी सर्वांना बॅगा आणि सामान टपावरून काढून गाडीमध्ये ठेवण्यास सांगितले आणि रत्नागिरीच्या स्टॅंडजवळ संपर्कात रहा, आम्ही सामान पार्सल रुममध्ये ठेवतो असे आश्वासन दिले. सर्व मंडळी चालत चालत पालीमध्ये आली तेथे त्यांनी आणि ड्रायव्हर-कंडक्टरनी भात-पिठले खाउन घेतले आणि हिरवे कुटुंबाचे ऋणी होऊन आम्ही सर्वजण रत्नागिरीकडे वाटचाल सुरु केली तेव्हा दुपारचे ३ वाजले होते. हातखंब्यापर्यंत अनेक झाडे दोन्ही बाजूने रस्त्यात पडली होती. सुदैवाने पाऊस अजिबात नव्हता. कधी झाडांवरून उड्या मारून, कधी बाजूच्या डोंगरावरून अशा अनेक कसरती करीत, बरोबरच्या कुटुंबांना सहकार्य करीत करीत आम्ही एकदाचा हातखंबा तिठा गाठला. आणि आम्हाला हायसे वाटले. त्यानंतरच्या पायपिटीत मात्र आम्हाला वेगवेगळ्या अन्य ठिकाणांहून तेथे आलेले प्रवासी भेटले आणि मग एकमेकांचे वादळातील अनुभव कथन करता करता शिवाजीनगर बस स्टॉप केव्हा आला ते कळलेच नाही. एस टी ने सायंकाळपर्यंत शिवाजीनगर ते स्टॅंड बस सेवा सुरु केली होती. नेमकी त्याचवेळी एक बस आली. दमली भागली आम्ही मंडळी त्यात बसून स्टॅंडवर आलो. बसमधून उतरताना माझे काका (पर्शराम केळकर) मला भेटले आणि मला खूप आनंद झाला. मग आम्ही दोघे घराकडे निघालो. मिट्ट काळोखात आम्ही कसे बसे विठ्ठल मंदिरापर्यंत आलो. एका सदगृहस्थानी ओळखून आधीच कल्पना दिली की टिळक आळीतून तुम्ही घरात प्रवेशच करू शकणार नाही कारण खूपच झाडे रस्त्यावर पडली आहेत. डॉ. बा. ना सावंत रोडवरील राधाकृष्ण थिएटरच्या मागूनच तुम्हाला घरात जाता येईल. थिएटर पर्यंत कसे बसे आलो आणि मॅनेजर राजाभाऊ कुलकर्णी देवासारखे भेटले. त्यांनी स्वत: बॅटरीने आम्हाला घरपोच केले. आई-वडील मुंबईत होते. काळजी करणाऱ्या आजोबा-आजींचा जीव एकदाचा भांड्यात पडला.
दुसऱ्या दिवशी टिळक आळीतील झाडांची दुर्दशा पाहिली. त्यानंतर मला आठवत त्याप्रमाणे १ ते दिड महिना आम्हाला वीज पुरवठा नव्हता. आम्ही कंदिलातच रात्री काढल्या. अभ्यास कंदिलात केला वगैरे वगैरे फुशारक्या मारणार नाही कारण एकतर दिवाळीची सुट्टी होती आणि नजिकच्या काळात कोणतीच परीक्षाही नव्हती.
अत्यंत तुटपुंज्या साधन सामुग्रीमधून ८-१० दिवसात झाडे बाजूला होऊन रस्ते सुरु करणाऱ्या तत्कालीन सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. विचार करा करवती घेऊन २-३ फूट व्यासाचे झाड कापावयाचे म्हणजे किती मेहनतीचे काम होते. वीज वाहिन्या जोडण्यासाठी केवळ पायाने पोलवर चढावयाचे आणि छोट्याश्या लाकडी पाळण्यावर लटकून काम करायचे आव्हान त्या काळात ज्यानी ज्यानी केले ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत. त्या संकटकाळात मध्ये वीज मंडळाच्या वायरमननी केलेली कठोर मेहनत पाहून आयुष्यभर त्यांच्याबद्दल आदराचे भावना मनात राहिली आहे असे वाटते.
हो एक गंमत मात्र सांगायची राहून गेली वादळानंतर घराघरात कपडे वाळत घालण्यासाठी टेलिफोन तारा अनेक घरात दिसून येत होत्या. नाहीतरी फुकट गेलेल्या तारांचा उपयोग अशाप्रकारे कोकणी माणसाने योग्य पद्धतीनेच केला नव्हे का!
फैयान आणि निसर्ग वादळांपेक्षा हा आजच्या परिभाषेत –ग्राऊंड झिरोचा-अनुभव वेगळाच आहे ना !
ॲड.धनंजय जगन्नाथ भावे–९४२२०५२३३०