
महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे येत्या 21 मे रोजी राज्यव्यापी बंदची हाक
महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे येत्या 21 मे रोजी राज्यव्यापी बंदची हाक देत मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ई- बाईक टॅक्सीला महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचा तीव्र विरोध दर्शवला असून या निर्णयविरोधात राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (RTO) 21 मे रोजी निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.ई-बाईक टॅक्सीमुळे 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शासनाने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याआधी संघटनेबरोबर चर्चा करणे आवश्यक होतं, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजूरी तातडीने रद्द करण्यात यावी. या करिता दि. 21 मे 2025 रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रच्या सर्व संलग्नीत संघटनांद्वारे महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने केली जातील. असे ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने त्यांच्या पत्रात म्हंटले आहे. बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-बाईक टॅक्सी आणावी किंवा नाही या करिता राज्य शासनाकडून नेमलेल्या समितीसमोर आमच्या संघटनेमार्फत ई-बाईक टॅक्स टॅक्सीला विरोध करण्यात आला, तसेच त्याचे कारण ही समितीसमोर मांडण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ई-बाईक टॅक्सी या सेवेला परवानगी देणे अगोदर आमच्या संघटने बरोबर चर्चा करणे आवश्यक होते, परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने एकतर्फी निर्णय घेत ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली. ई-बाईक टॅक्सी /बाईक पुलींग सुरू झाल्यास महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात येणार आहे. असेही संघटनेमार्फत सांगण्यात आले




