
इंग्रजीच्या अध्ययनासाठी त्यांना शिकवणारे ”साधन अद्यापक” इंग्रजी माध्यमातील असावेत, ही अट शासनाने मागे घ्यावी – विलास पाटणे
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या इंग्रजीच्या अध्ययनासाठी त्यांना शिकवणारे ”साधन अद्यापक” इंग्रजी माध्यमातील असावेत, अशी अट शासनाने घातली आहे.ही अट अन्यायकारक असून सरकारने ती मागे घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केली.
ॲड. पाटणे म्हणाले, केवळ इंग्रजी माध्यमात शिकल्याने त्यांना इंग्रजी भाषा नीट समजली आहे, हे गृहितक चुकीचे आहे. इंग्रजीवर प्रभुत्व आणि त्याचे शिक्षण इंग्रजी भाषेच्या माध्यमातून झाले आहे याचा परस्पर काही संबंध नाही. एका भाषेवर प्रभुत्व केवळ त्या माध्यमातून शिकल्यामुळे येते, हा शासनाचा गैरसमज आहे.
भाषेची रचना, व्याकरण व त्या भाषेत विचार करण्याची क्षमता केवळ त्या माध्यमातून शिकल्याने येणार नाही. एका अर्थाने हे इंग्रजीचे शिक्षणव्यवस्थेवर अतिक्रमण आहे. मराठी शाळांचे खच्चीकरण आणि इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण आता खेड्यापाड्यात पोहोचले आहे.
भाषा जेव्हा प्रवाही बनते तेव्हाच ती सक्षमतेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू करते. मराठी शाळा बंद पडत आहेत, अशा स्थितीत दुकाने आणि सरकारी कार्यालयातील नावांच्या पाट्या मराठीत लावणे बंधनकारक करून मराठी ज्ञानभाषा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com