
शासकीय निर्णय आणि संभ्रमित जनता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवेळी शासन पातळीवर वेगवेगळी परिपत्रके काढली जात आहेत. मात्र या परिपत्रकात विविध खात्यांचा समन्वय नसल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनबाबत व अन्य बाबतीत काढलेल्या आदेशाबाबत जिल्हा प्रशासनाला अधिकार दिल्याने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष लावले जात आहेत. रत्नागिरी शहरात लॉकडाऊनबाबत ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नाने शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता रोज दुकाने उघडत आहेत. असे असले तरी रत्नागिरी नगरपरिषदेच्या घंटागाडीवर या सूचनेची ऑडिओ वाजविली जात आहे. त्यामध्ये १५ जुलैपर्यंत लॉकडाऊन असल्याने लोकांनी बाहेर पडू नये, दुकाने बंद आहेत, टू व्हिलर, फोर व्हिलरला बंदी आहे अशा सूचना अद्यापही केल्या जात आहेत. त्यामुळे घेतलेला निर्णय आणि विरुध्द देण्यात येणार्या सूचना यामुळे नागरिकांच्यात संभ्रमावस्था वाढत आहे. बरे याबाबत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देवून रोज दुकाने चालू करण्याबाबत अद्यापही लेखी आदेश काढलेला नाही. असे अनेक बाबतीत विसंगती दिसत आहे. रिक्षा वाहतुकीबाबतही स्पष्टता नाही. एकीकडे हॉटेल व्यावसायिक ३३ टक्के चालू करावेत असे राज्य शासनाचे आदेश आहेत. परंतु रत्नागिरीत मात्र ती लागू नाहीत. हॉटेल व्यावसायिकांना अद्याप त्यांना परवानगी दिलेली नाही. मात्र असे असताना रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू आहेत व लोक सोशल डिस्टंसिंग न पाळता त्या ठिकाणी ओसंडून गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे खरे नियम काय व त्याच्या अंमलबजावणीबाबत जनता दिवसेंदिवस संभ्रमात पडत चालली आहे.
www.konkantoday.com